जिल्ह्यातील ५१ केंद्रांवरून सुरू आहे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST2021-03-18T04:28:54+5:302021-03-18T04:28:54+5:30
गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणाला वेग प्राप्त व्हावा यासाठी लसीकरण ...

जिल्ह्यातील ५१ केंद्रांवरून सुरू आहे कोरोना लसीकरण
गोंदिया : जिल्ह्यात सध्या कोरोनाचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणाला वेग प्राप्त व्हावा यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण ५१ केंद्रांवरून सध्या कोरोना लसीकरण सुरू असून, आतापर्यंत एकूण ३९८३० जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५४४५ जणांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे, फ्रंट लाइन वर्कर्स यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील दुर्धर आजार असलेल्यांना लसीकरण केले जात आहे. दुसऱ्या टप्प्यात सुरुवातीला १६ सरकारी आणि ६ खासगी लसीकरण केंद्रांवरून लसीकरण केले जात होते. मात्र, या केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी वाढल्याने जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येसुद्धा कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना तालुका आणि जिल्हास्तरावर करावी लागणारी पायपीट कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या ५१ केंद्रांवरून कोरोना लसीकरण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत ३९८३० जणांना पहिला डोस, तर ५४४५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी सहा दिवस लसीकरणाची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे.
............
एसटीच्या चालक वाहकांना दिली लस
कोरोना लसीकरणाला सुरुवात होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी जोखीम पत्करून सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरणास आरोग्य विभागाकडून प्राधान्य दिले जात नव्हते. त्यामुळे या प्रकारावर नाराजी व्यक्त केली जात होती. यानंतर आरोग्य विभागाने याची दखल घेत बुधवारी एसटीच्या चालक आणि वाहकांना कोरोनाची लस दिली.
.......
खासगी शाळेतील शिक्षक लसीकरणापासून वंचित
कोरोना संसर्गाच्या काळात शासन आणि प्रशासनाने खासगी शाळांचा कोविड केअर सेंटरसाठी वापर केला, तसेच कोरोना सर्वेक्षण करण्यासाठीसुद्धा खासगी शाळेतील शिक्षकांच्या ड्यूट्या लावल्या; पण कोरोना लसीकरणात खासगी शाळेतील शिक्षकांना डावलण्यात आले आहे. सेवा घेण्यासाठी खासगी शाळांचे शिक्षक चालतात. मात्र, कोरोना लसीकरणासाठी चालत नाहीत, असे चित्र आहे. या प्रकारामुळे खासगी शाळा संचालक आणि शिक्षकांमध्येसुद्धा रोष आहे.