ग्रामीण रुग्णालयातील कोरोना चाचणी बंद ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:02+5:302021-04-23T04:31:02+5:30
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांची ...

ग्रामीण रुग्णालयातील कोरोना चाचणी बंद ()
अर्जुनी मोरगाव : तालुक्यात मागील आठवडाभरापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. मात्र मागील दोन दिवसापासून येथील ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी आणि रॅपिड टेस्ट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांअभावी कोरोना चाचणी बंद असल्याची माहिती पुढे आली आहे.
कोरोनाचे थैमान थांबता थांबेना असेच चित्र आहे. लहान मुलांपासून तर युवक,वयोवृद्धांपर्यंत सर्वांना या संक्रमणाने ग्रासले आहे. थोडा जरी उपचाराला उशीर झाला तरी ते जीवावर बेतत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे उपचार सुरू करण्यासाठी निदान होणे आवश्यक असते. मात्र अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मागील दोन दिवसापासून कोरोना चाचणी करणे बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. कोरोना चाचणीसाठी आलेल्या अनेेकांना आल्या पावलीच परतावे लागत आहे. यामुळे संसर्ग कमी होण्याऐवजी त्यात वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगत मनुष्यबळ उपलब्ध होताच चाचण्या सुरळीतपणे सुरु केल्या जातील असे सांगितले.
......
ग्रामीण आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला
शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यातच या ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे डॉक़्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला असून ते सुद्धा रात्रंदिवस काम करत आहे. त्यामुळे त्यांचा सुद्धा पर्याय नसल्याचे चित्र आहे.
...........
ग्रामीण भागातील स्टॉफ जिल्हास्तरावर
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे सलाईनवर आहे. अशात आता ग्रामीण भागातील काही डॉक्टर आणि परिचारिकांना जिल्ह्याच्या ठिकाणी बोलविण्यात आले आहे. तर काही स्टाफ बाहेर जिल्ह्यात प्रतिनियुक्तीवर पाठविला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र आहे.
........
गावच्या गावे होत आहेत बाधित
अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. छाेट्या छोट्या गावात ४० ते ५० रुग्ण निघत असल्याने गावच्या गावे बाधित होत असल्याचे चित्र आहे. खांबी, नवेगाव, केशोरी, इटखेडा, बोंडगाव या गावांमध्ये सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने बिकट समस्या निर्माण झाली आहे. या गावामध्ये कंटेनमेंट झोन देखील घोषित करण्यात आले आहे.
........
तालुका आरोग्य अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयात आधीच मोजकाच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. त्यातच आता ग्रामीण रुग्णालयातील काही स्टाफ कोविड केअर सेंटरसाठी नियुक्त करण्याचे आदेश वरुन धडकले आहेत. अशात नियोजन करायचेे कसे या पेचात सध्या तालुका आरोग्य अधिकारी आहेत.