आठ आठ दिवस कोरोना चाचणीचा अहवाल मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST2021-04-07T04:30:13+5:302021-04-07T04:30:13+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे, मात्र अशातच कोरोना चाचणी करणाऱ्यांना आठ आठ दिवस अहवाल मिळत नसल्याची ...

आठ आठ दिवस कोरोना चाचणीचा अहवाल मिळेना
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे, मात्र अशातच कोरोना चाचणी करणाऱ्यांना आठ आठ दिवस अहवाल मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे. यामुळे कोरोना संसर्गात अधिक वाढ होण्याची शक्यता असून, चाचणी करणाऱ्यांचे कुटुंबीयसुध्दा भीतीच्या वातावरणात वावरत असल्याचे चित्र आहे.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन आरोग्य विभागाने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. शासकीय आणि खासगी प्रयाेगशाळांमधून दरराेज एकूण २१०० चाचण्या केल्या जात आहेत. मात्र कोरोना चाचणी केल्यानंतर किमान चोवीस तासांत त्याचा अहवाल मिळणे अपेक्षित आहे. शिवाय एखाद्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याला त्याच्या नोंदणी क्रमांकावर एसएमएस पाठविला जातो. त्यामुळे बाधित रुग्ण वेळीच रुग्णालयात दाखल हाेतो, यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. मात्र गोंदिया जिल्ह्यात सध्या कोरोना चाचणी केल्यानंतर आठ आठ दिवस त्याचा अहवाल प्राप्त होत नसून त्याचा एसएमएससुध्दा येत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार गोंदिया शहरातील रामनगर येथील कुटुंबीयांनी रामनगर येथील नगर परिषद कोविड केअर सेंटरवर कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी ३१ मार्च रोजी केली. मात्र याचा अहवाल त्यांना आठ दिवसांचा कालावधी लोटूनही प्राप्त झाला नाही. यासंदर्भात त्यांनी चौकशी केली असता अहवाल यायचा आहे असे सांगून परत पाठविण्यात आले. विशेष म्हणजे चाचणीनंतर मोबाइलवर एसएमएस पाठविला जात होता. मात्र ती सेवासुध्दा मागील आठ दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकारामुळे कोरोनाच्या संसर्गात अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
............
एनआयसीचे सर्व्हर डाऊन
कोरोना चाचणी केल्यानंतर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह आल्यास त्याची माहिती रुग्णाच्या मोबाइलवर एसएमएसच्या माध्यमातून पाठविली जाते. एसएमएस पाठविण्याच्या एनआयसी (जिल्हा सूचना विज्ञान केंद्रात) यंत्रणेत बिघाड आला आहे. त्यामुळे ते दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, त्यामुळेच चाचणी करणाऱ्यांना एसएमएस जात नसल्याची माहिती आहे.
.........
मनुष्यबळाचा तुटवडा
गोंदिया शहरात सध्या चार आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू आहेत. पुन्हा केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे ही केंद्रे सुरू झालेली नाही. त्यामुळे कोरोना चाचण्यांचा अहवालसुध्दा पाठविण्यास अडचण निर्माण हाेत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.
.......
कसे रोखणार कोरोनाला?
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा ग्राफ सातत्याने वाढत आहे. वाढत्या संसर्गाला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागाने ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर दिला आहे. मात्र दुसरीकडे कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल आठ आठ दिवस मिळत नसल्याने कोरोना संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
............