कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST2021-07-24T04:18:20+5:302021-07-24T04:18:20+5:30

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले असून, आता सर्वांच्याच नाकीनऊ आले आहे. त्यात पावसाळा सुरू झाला असून, ...

Corona, similar to the symptoms of dengue; Get tested right away! | कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या!

कोरोना, डेंग्यूची लक्षणे सारखीच; तातडीने चाचणी करून घ्या!

गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले असून, आता सर्वांच्याच नाकीनऊ आले आहे. त्यात पावसाळा सुरू झाला असून, डासांपासून डेंग्यूचा धोका वाढत आहे. विशेष म्हणजे, कोरोना व डेंग्यू या दोघांची लक्षणे सारखीच असल्याने नेमका कोणता आजार जडला आहे हे चाचणीतूनच स्पष्ट होऊ शकेल व त्यानुसार उपचार करता येतील. यामुळे लक्षण असल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करून घेण्याची गरज आहे.

----------------------------

चाचणी कुठली?

कोरोनासाठी - आरटी-पीसीआर

डेंग्यूसाठी - एनएस-१ अँटिजन

----------------------

सर्दी, खोकला व ताप

कोरोनाचा सध्या चांगलाच प्रकोप सुरू असून आता जेमतेम परिस्थिती नियंत्रणात आली आहे. कोरोनामध्ये नागरिकांना सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होणे, घसा खवखवणे ही प्राथमिक लक्षणे दिसून येतात. विशेष म्हणजे, ही सर्व लक्षणे डेंग्यू रुग्णांतही असतात. त्यामुळे कोरोना की डेंग्यू? याबाबत स्पष्टपणे सांगता येत नाही. यासाठी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी तसेच डेंग्यूसाठी एनएस-१ अँटिजन चाचणी करणे गरजेचे आहे. दोन्ही चाचण्या जिल्ह्यात होतात.

-----------------------

पाणी उकळून प्या, डासांपासून सावध राहा

- पावसाळ्यात पाण्यापासून आजारांचा धोका बळावत असल्याने पाणी उकळून प्यावे.

- पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होत असून, डेंग्यूचा धोका बळावतो. त्यामुळे डासांपासून बचाव करावा.

- शिवाय कीटकजन्य आजारांपासून बचावासाठी आपला परिसर स्वच्छ ठेवावा.

-----------------------------

कोट

कोरोनापासून बचावासाठी तोंडावर माक्स, हात वारंवार स्वच्छ धुणे तसेच शारीरिक अंतराचे पालन या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे. तर डेंग्यूपासून बचावासाठी डासांपासून आपला बचाव करावा. पाणी साचू देऊ नये व मच्छरदानीचा वापर करावा. काही लक्षणे असल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्रात जाऊन चाचणी करवून घ्यावी.

- डॉ. नितीन कापसे,

जिल्हा आरोग्य अधिकारी, गोंदिया.

Web Title: Corona, similar to the symptoms of dengue; Get tested right away!