कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:31 IST2021-08-27T04:31:33+5:302021-08-27T04:31:33+5:30

केशोरी : गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पहिली ते सातव्या वर्गासह प्राथमिक शाळा बंदच आहेत. यावर्षीसुद्धा शाळेचे सत्र सुरू ...

The corona shattered the students' academic watch | कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी विस्कटली

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी विस्कटली

केशोरी : गेल्या वर्षीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पहिली ते सातव्या वर्गासह प्राथमिक शाळा बंदच आहेत. यावर्षीसुद्धा शाळेचे सत्र सुरू झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास नसल्यामुळे फक्त विद्यार्थ्यांसमोर खेळ आणि खेळच असल्याने पूर्णत: अभ्यासाची सवय बंद झाली आहे. प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असून, प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी विस्कटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोना महामारीचा शिरकाव होण्यापूर्वी सर्व शाळा नियमित सुरू होत्या. त्यामुळे विद्यार्थी दिवसभर शाळेत व्यस्त राहत असत. घरी आल्यानंतर शाळेतून मिळालेले होमवर्क करण्यात व्यस्त राहत होती. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्राथमिक शिक्षणाचे वर्ग बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची दिनचर्याच बदलली आहे. विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त वेळ निव्वळ खेळण्यात जात आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शाळेत दाखल झालेली लहान मुले जीवनातील महत्त्वाच्या पायाभूत शिक्षणात मिळणारी अक्षर ओळख आणि इंग्रजी वर्णाक्षरे विसरली आहेत. आरोग्यतज्ज्ञांकडून पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे शासन शाळा सुरू करण्याच्या निर्णयात वेळोवेळी बदल करीत आहे. यावर्षी तर शाळेचे सत्र सुरू झाले नाही. शाळा बंदच राहील की काय? असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकून आहे. पालक जेव्हा विद्यार्थ्यांना अभ्यास कर असे म्हणतात तेव्हा विद्यार्थी पालकांना उत्तर देताना म्हणतो की, शाळाच बंद आहेत. आम्ही अभ्यास कशाचा करायचा. त्यामुळे पालक हैराण झाले आहेत. पाल्य पालकांचे ऐकण्यास तयार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याची पालकांना काळजी वाटू लागली आहे. एकंदरीत कोरोनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक घडी विस्कटल्याचे चित्र निर्माण झाले आहे, हे निश्चित.

Web Title: The corona shattered the students' academic watch