गावागावात कोरोनाचा उद्रेक, दोन दिवसात दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:40+5:302021-04-23T04:31:40+5:30
अमरचंद ठवरे बोंडगावदेवी : अख्या देशभर कोरोना महामारीचा उद्रेक सुरू आहे. पहिल्या लाटेत एवढा प्रादुर्भाव नव्हता त्यामुळे ग्रामीण भाग ...

गावागावात कोरोनाचा उद्रेक, दोन दिवसात दोघांचा मृत्यू
अमरचंद ठवरे
बोंडगावदेवी : अख्या देशभर कोरोना महामारीचा उद्रेक सुरू आहे. पहिल्या लाटेत एवढा प्रादुर्भाव नव्हता त्यामुळे ग्रामीण भाग सुरक्षित वाटत होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या झपाट्याने शिरकाव केलेला आहे. कोरोना चाचणीत बाधितांची आकडे दिवसेंदिवस फुगीर होत आहेत. बाधित रुग्ण घरामध्ये गृह विलगीकरणात राहून प्राथमिक औषधोपचार करून रामभरोसे दिवस काढीत आहेत. दोन दिवसात दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थ नागरिक भयभीत असल्याचे चित्र आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना मात्र तालुक्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना बाधित रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात नेले असता, त्याला कोविड सेंटरमध्ये उपचार न करता घराची वाट दाखविण्याचा प्रकार नुकताच घडला. कोरोनाबाधित वाढत असल्याने गावातील सामान्य जनता भयभीत झाली आहे. परिसरात कोरोना तपासणीसाठी लोकांचा प्रतिसाद वाढत आहे. पण आरोग्य यंत्रणेकडे पाहिजे त्याप्रमाणात किटच उपलब्ध नाहीत. प्रतिबंधात्मक लससुध्दा मोजक्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याची माहिती आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोनाची भयावह परिस्थिती निर्माण झाली असताना आरोग्य सेवा मात्र कोलमडली आहे. तालुक्यातील केशोरी, बोंडगावदेवी, खांबी, नवेगावबांध, इटखेडा तसेच काही गावांमध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे.
......
दोघांचा मृत्यू
बुधवार व गुरुवार या दोन दिवसात दोन बाधितांचा मृत्यू झाल्याने ग्रामीण जनता धास्तावून गेली आहे. बुधवारला (दि.२१) चान्ना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजकुमार किसन शहारे (५५) यांचे गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निधन झाले. बोंडगावदेवी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक मारोती भैसारे (६०) यांचे गुरुवारी सकाळी राहत्या घरीच कोरोनामुळे निधन झाले. गावात पहिल्यांदाच कोरोना संक्रमणाने निधन झाल्याने ग्रामस्थांनी चांगलाच धसका घेतला.
........
रेफर टू चा धडका सुरू
गावातील ६३ वर्षीय एक नागरिक दोन दिवसापूर्वी रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये कोरोना बाधित निघाला. स्थानिक आरोग्य पथकाने त्याला घरीच विलगीकरण राहण्याचा सल्ला दिला. अचानक दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावली. बुधवारच्या रात्री ११.३० वाजता अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे सांगण्यात आले. त्या कोरोना बाधिताला कोविड सेंटरमध्ये तपासणी न करता गोंदियाला रेफर करण्याचा सल्ला दिला. अखेर घरच्यांनी आरोग्य विभागाच्या नाकर्तेपणामुळे घरची वाट धरून कोरोना बाधिताला घरी आणले.