कोरोना महामारीने हिरावली रोजीरोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST2021-04-25T04:29:07+5:302021-04-25T04:29:07+5:30
सडक-अर्जुनी: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांची रोजीरोटी हिरावली गेली. कामधंदे बुडाले, त्यामुळे अनेकजण बैचेन असतानाच थोड्याफार प्रमाणात का होईना उदरनिर्वाहाचा ...

कोरोना महामारीने हिरावली रोजीरोटी
सडक-अर्जुनी: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकांची रोजीरोटी हिरावली गेली. कामधंदे बुडाले, त्यामुळे अनेकजण बैचेन असतानाच थोड्याफार प्रमाणात का होईना उदरनिर्वाहाचा प्रश्न शिवभोजनाने मिटविला आहे.
शासनाच्या अनन नागरी व पुरवठा विभागाच्या निर्देशानुसार महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया, महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत आधार लोकसंचालीत साधन केंद्र व संस्कृती बचत गट सडक अर्जुनीच्यावतीने २ एप्रिल २०२० पासून सडक अर्जुनी येथे शिवभोजनाचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून येथे शिवभोजन केंद्र सुरु आहे. मागील वर्षापासून देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजला आहे. त्यामुळे या काळात गरीब, गरजू, मजूर, बेघर, वाटसरु आदींसाठी शिवभोजन वरदान ठरले आहे.
पुर्वी एका लाभार्थ्याला पाच रुपयात एक ताटी शिवभोजन देण्यात येत होते. तसेच एक दिवशी ७५ लाभार्थ्यांना शिवभोजन देण्याची व्यवस्था होती. आता कोरोनाच्या प्रादुर्भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शासनाने एक महिन्याकरिता लाभार्थ्यांना मोफत शिवभोजन देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार येथील शिवभोजन केंद्रात १९ एप्रिल ते १९ मे पर्यंत मोफत शिवभोजन देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून एका दिवशी १३८ लाभार्थ्यांना (१३८ ताटी) शिवभोजन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभोजनाची वेळ पुर्वी सकाळी ११ ते दुपारी ३ होती. आता सकाळी ७ ते ११ अशी ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाभार्थ्यांना शिवभोजन केंद्रात न देता पार्सलची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एका लाभार्थ्याला एका ताटीमध्ये वरण,भात, भाजी व दोन पोळी एवढा आहार देण्यात येत आहे. शिवभोजन तयार करण्यासाठी येथील संस्कृती महिला बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा झिंगरे, उपाध्यक्ष मीरा जगताप, सचिव किरण निर्वाण व तृप्ती हलवादिया आदी सेवा देत आहेत.
कोट
शासनाच्या आदेशानुसार एक महिन्यासाठी शिवभोजन मोफत देण्यात येणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लाभार्थ्यांना पार्सलची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गरजू, गरीब लाभार्थ्यांनी शिवभोजनाचा लाभ घ्यावा.
पी.आर.कापडे, पुरवठा निरीक्षक सडक-अर्जुनी