सालेकसा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची समन्वय सभा
By Admin | Updated: October 18, 2014 23:28 IST2014-10-18T23:28:08+5:302014-10-18T23:28:08+5:30
तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने अतिदुर्गम, अतीसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात असलेल्या संपूर्ण तालुक्यातील गावात आरोग्य व स्वच्छता व आरोग्य विषयीच्या विविध योजनांची माहिती

सालेकसा तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची समन्वय सभा
सालेकसा : तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने अतिदुर्गम, अतीसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागात असलेल्या संपूर्ण तालुक्यातील गावात आरोग्य व स्वच्छता व आरोग्य विषयीच्या विविध योजनांची माहिती देण्याच्या हेतुने चर्चासत्राचे आयोजन पंचायत समिती सभागृह सालेकसा येथे करण्यात आले होते. या चर्चासत्रासाठी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
या सभेला सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी केले होते. त्यानुसार तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
या चर्चासत्राला मुख्य कार्यपालन अधिकारी डी.डी.शिंदे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.एस.कळमकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धकाते, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वाघमारे, सहायक संचालक कुष्ठरोग डॉ. आर.डी.त्रिपाठी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पाटील, तहसीलदार खापेकर, पोलीस निरीक्षक रणदिवे, खंडविकास अधिकारी व्ही.यु. पचारे उपस्थित होते. या चर्चासत्रात साथरोग, ग्रामस्वच्छता, आरोग्य विषयक माहिती, शासनाच्या विविध योजना व त्यांची अंमलबजावणी कशा प्रकारे ग्राम स्तरावर करण्यात यावी. तसेच वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, आशा कार्यकर्ता, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक यांच्याशी समन्वय कशाप्रकारे साधण्यात येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यू, मलेरिया, साथरोग कावीळ सारखे अनेक आजार उद्भवल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना कशाप्रकारे करावी, तालुक्यातील पूरग्रस्त व नदीलगतच्या गावातील लोकांना या काळात कशाप्रकारे मदत करावी याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. सालेकसा तालुक्यातील कोणत्याही गावात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्यास तत्काळ सर्वांच्या सहकार्याने गावस्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरीत करता येईल.
याप्रकारे विविध योजनाबाबत व वेगवेगळ्या विषयावर विस्तृत चर्चासत्र व समन्वय सभेचे आयोजन जिल्ह्यामध्ये प्रथमच करण्यात आले होते.
तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक या सर्वांना आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)