धान खरेदी केंद्र सुरू करण्यास सहकारी सब एजंट संस्था उदासीन

By Admin | Updated: October 28, 2014 23:00 IST2014-10-28T23:00:02+5:302014-10-28T23:00:02+5:30

शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी करणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सब एजन्ट संस्था संघटनेची सभा आदर्श धान गिरणी सानगडी येथे संघटनेचे अध्यक्ष नामदेव कापगते यांच्या

Cooperative All Agent Institute to Start Paddy Purchase Center Depressed | धान खरेदी केंद्र सुरू करण्यास सहकारी सब एजंट संस्था उदासीन

धान खरेदी केंद्र सुरू करण्यास सहकारी सब एजंट संस्था उदासीन

अर्जुनी/मोरगाव : शासकीय आधारभूत हमीभाव धान खरेदी करणाऱ्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सब एजन्ट संस्था संघटनेची सभा आदर्श धान गिरणी सानगडी येथे संघटनेचे अध्यक्ष नामदेव कापगते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथील धान खरेदी करणाऱ्या सह. संस्थाचे अध्यक्ष, सचिव व संचालक उपस्थित होते.
सभेमध्ये धान खरेदी करणाऱ्या संस्थांपुढे येत असलेल्या अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये सन २००९-१०, २०१०-११ मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी शासनाकडून ३६ ते ४० महिन्यांपर्यंत उचल करण्यात आली. यामध्ये नैसर्गिक घट जास्त प्रमाणात आलेली आहे. उशीरा भरडाईसाठी शासनाने धानाची उचल केली. याला सब एजन्ट संस्था जबाबदार नाहीत. तरी त्यामध्ये आलेली संपूर्ण घट मंजूर करावी. तसेच सब एजन्ट संस्थांकडे खरीप व रब्बी हंगामाचा २०१४ चा धानसाठा पडून आहे. त्याच्या भरडाईसाठी अजूनपर्यंत उचल झालेली नाही. त्यामध्ये येणारी नैसर्गिक घट मंजूर करण्यात यावी. गोदाम मालकांचे सन २००९ ते २०१३-१४ पर्यंतचे गोदाम भाडे मिळाले नाही, ते देण्यात यावे. भाडे न मिळाल्यामुळे गोदाम मालक गोदामात धान ठेवण्यासाठी देण्यास तयार नाही. खरेदी खर्च व हमाली दरामध्ये वाढ करण्यात यावी. कारण शासनाने रोजगार हमी योजनेमध्ये मजुरीचे दर वाढविले आहेत. माथाडी कामगारांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे खरेदी केंद्रावर धान काटा करण्यासाठी हमाल मिळत नाहीत. त्यामुळे हमाली दर रुपये १७ प्रति क्विंटल देण्यात यावे. धान खरेदी करणाऱ्या सब एजन्ट सहकारी संस्थाचे वर्ष २००९-१०, २०१०-११, २०११-१२, २०१२-१३, २०१३-१४ चे धान खरेदीचे हिशेब झालेले नाहीत. ते पूर्ण करण्यात यावे व संस्थांना कमिशन देण्यात यावे. धान खरेदीवरील कमिशन पाच टक्के देण्यात यावे, अशी संघटनेची मागणी आहे.
आधारभूत हमी भाव धान खरेदी केंद्रांमध्ये खरेदी केलेल्या धानाच्या साठवणुकीमध्ये येणारी तुट मंजूर किती राहील, हे खरेदीच्या वेळेस सब एजन्ट संस्थांना कळविण्यात यावे. याचे कारण म्हणजे सन २०१२ ते २०१४ मधील धान साठवणुकीधील घट अजूनपर्यंत मंजूर झालेली नाही. केंद्रावर धानाची खरेदी होताच त्वरीत भरडाईसाठी धानाची उचल करण्यात यावी, अशी मागणी सब एजन्ट संघटनेव्दारे करण्यात आली आहे.
सभेला भेरसिंग नागपुरे (आमगाव), रमेश चुऱ्हे, सदाशिव खैरे, विजयसिंह राठोड, घनशाम खेडीकर, नरेश दिवठे, रेखलाल टेंभरे, भूमेश्वर माहावडे, माणिकराव ब्राम्हणकर, टिकाराम बोरकर, खेडीकर, बबन श्रीकुंठवार, भिकाजी चव्हाण, गोपीचंद भेलावे, तलमले व मने आदी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Cooperative All Agent Institute to Start Paddy Purchase Center Depressed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.