महाराष्ट्र दिनापासून लिफ्टची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2017 00:44 IST2017-04-16T00:44:49+5:302017-04-16T00:44:49+5:30

गोंदिया रेल्वे स्थानकात प्रवाशांकरिता बहुप्रतीक्षित लिफ्ट येत्या महाराष्ट्र दिनी १ मे पासून सुरू होणार असून ....

The convenience of the lift from Maharashtra day | महाराष्ट्र दिनापासून लिफ्टची सोय

महाराष्ट्र दिनापासून लिफ्टची सोय

पटोले यांची माहिती : महाराष्ट्र एक्स्प्रेस लागणार प्लॅटफार्म एक वर
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकात प्रवाशांकरिता बहुप्रतीक्षित लिफ्ट येत्या महाराष्ट्र दिनी १ मे पासून सुरू होणार असून याचवेळी महाराष्ट्र एक्सप्रेस नागरिकांच्या सुविधेसाठी प्लॅटफार्म क्रमांक ५ ऐवजी प्लॅटफार्म क्रमांक १ वर लागणार आहे. खासदार नाना पटोले यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ही माहिती दिली.
बिलासपूर झोनमधील सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वेस्थानक असतानाही गोंदिया स्थानकावर अनेक वर्षांपासून लिफ्ट किंवा एस्कलेटरची सुविधा नसल्यामुळे अपंग, वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा त्रास दूर करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून लिफ्ट व एस्कलेटरचे काम सुरू आहे. १ मे पासून ही लिफ्ट प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
गोंदिया स्थानकाचे विस्तारीकरण सुरू केल्यानंतर गोंदिया-कोल्हापूर या महाराष्ट्र एक्सप्रेसचा थांबा सर्वात शेवटच्या म्हणजे प्लॅटफार्म क्रमांक ५ वर देण्यात आला. यामुळे सकाळी कोल्हापूरकडे निघताना किंवा रात्री गोंदियात दाखल झाल्यानंतर बाहेर निघताना प्रवाशांना मोठा फेरा करून शेवटच्या प्लॅटफार्मवर जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या गाडीचा थांबा रेल्वे स्थानकात मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आधी लागणाऱ्या पहिल्या प्लॅटफार्मवर द्यावा अशी मागणी सतत होत होती. त्यानुसार प्लॅटफार्म क्रमांक ॅ१ चा रेल्वे ट्रॅक नागपूर मार्गाला जोडल्यामुळे आता ती सुविधा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या महाराष्ट्र दिनी त्याची सुरूवात होत असल्याचे खा.पटोले यांनी सांगितले. १ मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील अपंगांना रेल्वेचे प्रमाणपत्र देण्यासाठी गोंदिया स्थानकावर विशेष शिबिर लावले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारने ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी फेटाळली असली तरी स्वतंत्र आयोग नेमण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या २०२१ मध्ये ओबीसींची जनगणना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)

शेतमालाला भाववाढ दिल्यास गरीब कसे जगणार?
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना खा.पटोले यांनी शेतकऱ्यांना उत्तरप्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र एकीकडे उत्पन्न खर्च वाढत असताना शेतमालाचे भाव कमी झाले यातून शेतकरी यातून कसा सावरणार? असे पत्रकारांनी विचारले असता शेतमालाचे भाव वाढल्यास गोरगरीबांना त्याचा फटका बसेल. ते कसे जगणार? असा प्रश्न खा.पटोले यांनी उपस्थित केला. मात्र सरकार स्वस्त धान्य दुकानातून गोरगरीबांची सोय करते, अशी आठवण करून दिल्यानंतर सरकार शेतकऱ्यांचा उत्पन्न खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The convenience of the lift from Maharashtra day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.