गरज नसलेल्या ठिकाणी साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम

By Admin | Updated: November 22, 2014 23:03 IST2014-11-22T23:03:48+5:302014-11-22T23:03:48+5:30

सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत बनविण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट साहित्य वापरुन तसेच गरज नसलेल्या ठिकाणी

Construction of storage bases without need | गरज नसलेल्या ठिकाणी साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम

गरज नसलेल्या ठिकाणी साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम

निकृष्ट दर्जा : केवळ शासनाचा निधी हडपण्याचा डाव, सरपंचाची तक्रार
सौंदड : सडक/अर्जुनी तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागांतर्गत बनविण्यात आलेल्या साठवण बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट साहित्य वापरुन तसेच गरज नसलेल्या ठिकाणी बांधण्यात आल्याचा आरोप शेंडा/कोयलारी येथील सरपंच व नागरिकांनी केला आहे. या साठवण बंधाऱ्यांची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सरपंचांनी केली आहे.
शेंडा कोयलारी येथील गट ग्रामपंचायत प्रधानटोला, कोहळीटोला, कोयलारी येथील सरपंच हिरालाल मेश्राम यांनी मोक्यावर जाऊन लघु पाटबंधारे विभागाने बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याची पाहणी केली. ज्या ठिकाणी बंधाऱ्याची गरज नाही, तिथे लघु पाटबंधारे विभागाद्वारे बंधारे बांधण्यात आल्याचे लक्षात आले. कोयलारी येथील आश्रमशाळेमागील तलावाचे क्षेत्रफळ ६० हेक्टर २३४ आर असून पश्चिम दिशेला आश्रमशाळा, उत्तर दिशेला कोहळीपार येथील शेतकऱ्यांची शेती, दक्षिण दिशेला तलावाची पाळ असून उरडबोडी आहे.
उरडबोडी तलावामधील पाटात साठवण बंधारा बांधण्यात आला आहे. कोयलारी, कोहळीपार या तलावाच्या पाटामध्ये लघुपाटबंधारे विभाग आमगावअंतर्गत आदिवासी उपयोजनेतून साठवण बंधाऱ्यासाठी २४/४/२०१२ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले. सन २०१३ मध्ये तयार केलेल्या या साठवण बंधाऱ्याला आता भेगासुद्धा पडल्या आहेत.
कोयलारी येथील तलावाच्या पाटात व कोहळीपार शिवाराच्या पठारावर कोणतीही साठवणूक क्षमता नसतानाही सदासावलीच्या झुडपामध्ये बंधारा तयार करण्यात आला. या दुसऱ्या बंधाऱ्याच्या कामासाठी आदिवासी उपयोजना २७०२, ४७९२ प्रशासकीय मान्यता १२/६/२०१२ असून बंधाऱ्याच्या बांधकामासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले. या बंधाऱ्याच्या बांधकामाचा निधी १० लाख रुपये जून २०१४ मध्ये खर्च करण्यात आला व बंधारा बांधण्यात आला.
कोयलारी येथील सरपंच या दुसऱ्या बंधाऱ्याच्या पाहणीसाठी गेले असता बंधारा पठारावर बांधत असल्याचे निदर्शनास आले. पठारावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला कंत्राटदाराकडून जेसीबी मशीनद्वारे नाल्याचे स्वरुप देण्याचे काम सुरू होते. लगेच सरपंच हिरालाल मेश्राम यांनी पत्रकारांना बोलावून पाहणी करण्यासाठी गेले असता कंत्राटदाराने जेसीबी मशीन घेवून पळ काढला. या दोन्ही बंधाऱ्याच्या कामावर शाखा अभियंता कटरे व शाखा अभियंता चव्हाण यांची देखरेख होती.
प्रथमदर्शनी या बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम दिसून येऊ नये व पावसाळ्यात बंधारा वाहून जाऊ नये म्हणून या साठवण बंधाऱ्याला प्लास्टर करुन निकृष्ट बांधकाम लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. लघु पाटबंधारे विभागांतर्गत तालुक्यातील शेंडा/कोयलारी येथे आदिवासी उपयोजनेअंतर्गत दोन साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले.
शेंडा कोयलारी येथील दोन्ही साठवण बंधाऱ्यांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून गरज नसलेल्या ठिकाणी बांधण्यात आले. तसेच दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. या दोन्ही बांधकामाची यथाशिघ्र चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच मेश्राम व गावकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Construction of storage bases without need

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.