जिल्ह्यात होणार १३ हजार शौचालयांचे बांधकाम
By Admin | Updated: October 9, 2014 23:04 IST2014-10-09T23:04:10+5:302014-10-09T23:04:10+5:30
देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या

जिल्ह्यात होणार १३ हजार शौचालयांचे बांधकाम
गोंदिया : देशातील ग्रामीण भागांना हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. सन २०१४ च्या शेवटपर्यंत जिल्ह्याला हागणदारीमुक्त करण्यासाठी जिल्ह्यात १३ हजारपेक्षा अधिक शौचालयांच्या बांधकामांना सुरूवात झालेली आहे. यासाठी ५१ गावांची निवड सन २०१३-१४ मध्ये करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातून देण्यात आली आहे.
गावांच्या विकासावरच देशाचा विकास निर्भर आहे. परंतु ग्रामीण भागात शासनाच्या योजना विलंबाने पोहचत असल्यामुळे गावकरी वेळेवर त्या योजनांचा लाभ घेवू शकत नाही. ग्रामीण भागात ६० टक्के नागरिक उघड्या परिसरात शौचविधीसाठी जातात. त्याच परिसरात खताचे खड्डे खोदून जनावरांचे मलमूत्र संग्रहीत केले जाते. त्यामुळे तेथे पिण्याचे पाणी दूषित होते. दूषित पाणी पिण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होवू लागतो. या प्रकारामुळेच अधिक प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होतो.
या बाबीला गांभीर्याने घेवून शासनाद्वारे गाव हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प घेत निर्मल भारत अभियानाची योजना अमलात आणण्यात आली. सदर योजनेंतर्गत लाभार्थी गावांची निवड करून त्या गावांत शौचालयांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील ५१ गावांना १३ हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देवून शौचालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या अभियानाची सुरूवात करून सन २०१४ च्या शेवटपर्यंत शौचालयांचे बांधकाम केले जाईल. सदर अभियानाची सुरूवात एप्रिल २०१२ पासून करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत सन २०२२ पर्यंत देश हागणदारीमुक्त होईल. त्यासाठी निर्मल भारत अभियानाच्या वतीने कार्यांना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शौचालयांचा लाभ दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारेच नव्हे तर इतर महिला परिवार प्रमुख, अपंग कुटूंब प्रमुख, भूमिहिन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, अनुसूचित जाती व जमातीमधील लाभार्थी निवडीचे कार्य केले जाईल.