महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी कायद्यांची निर्मिती
By Admin | Updated: March 11, 2016 02:22 IST2016-03-11T02:22:18+5:302016-03-11T02:22:18+5:30
लहानपणापासूनच आई-वडिलांनी आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना रूजविणे गरजेचे आहे.

महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी कायद्यांची निर्मिती
गोंदिया : लहानपणापासूनच आई-वडिलांनी आपल्या मुलांमध्ये समानतेची भावना रूजविणे गरजेचे आहे. मुलींना योग्य शिक्षण दिल्यास ती आपल्या पायावर उभी राहू शकते. यातूनच अत्याचारास प्रतिकार करण्याचे सामर्थ्य तिच्यामध्ये निर्माण होते. समाजाची मुलींबद्दलची मानिसकता सकारात्मक असली पाहिजे. त्यांना योग्य शिक्षण मिळाल्यास त्यांच्यावर अत्याचार होणार नाही. महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठीच महिलाविषयक कायदयाची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.जी. गिरटकर यांनी केले.
जिल्हा न्यायालय येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी न्या. गिरटकर होते. अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सदस्य सचिव तथा मुख्य न्यायदंडाधिकारी प्र.ह. खरवडे, न्या. माधुरी आनंद, सविता बेदरकर, टी.बी. कटरे, बीना बाजपेयी उपस्थित होते.
न्या. खरवडे यांनी, कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैगिक शोषण याविषयावर माहिती दिली. कोणत्याही कामाच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतील तर महिलांनी स्थापन असलेल्या समतीसमोर तक्रार केल्यास अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कारवाई करण्यात येते. तेव्हा महिलांनी न घाबरता होत असलेला अत्याचाराचा प्रतिकार करावा, असेही त्यांनी सांगितले.
न्या. आनंद यांनी महिलांचे कौटुंबीक हिंसाचारापासून संरक्षण कायदा व हुंडाप्रतिबंध कायदा याबाबतची माहिती दिली. हुंडा देणारा व घेणारा दोघेही शिक्षेस पात्र असून अशा प्रकारचे देवाण-घेवाण करू, नये असे विचारही त्यांनी मांडले.
प्रा. सविता बेदरकर यांनी, बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी कराटे शिकणे गरजेचे आहे असे सांगून त्या म्हणाल्या, जेवढे ब्युटी पार्लर आहे तेवढेच कराटे क्लासेस उघडणे गरजेचे आहे, असे सांगितले. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष डॉ.पी.बी. कटरे यांनी महिलांच्या शैक्षणिक व आर्थिक प्रबळतेवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात जिल्हा न्यायालयाच्या व्यवस्थापक नलिनी भारद्वाज, जे.सी.आय. संघटना, रोटरी क्लबच्या महिला सभासद, विधी विभागातील विद्यार्थिनी, नमाद महाविद्यालयाच्या विधी विभागातील प्रा. अश्विनी दलाल व न्यायालयातील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे महेंद्र पटले, शिवदास थोरात, कपिल पिल्लेवान, आर्यचंद्र गणवीर यांनी सहकार्य केले. संचालन शबाना अंसारी यांनी केले. आभार जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष सुनिता पिंचा यांनी मानले.