काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, सर्वांचा एकला चलो रे चा सूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 05:00 AM2021-11-29T05:00:00+5:302021-11-29T05:00:24+5:30

२१ डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेनेने सुद्धा एकला चलो रे चा सूर आवळला असून त्या दृष्टीनेच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचा कानमंत्र दिला आहे. तसेच याचाच ते वांरवार उच्चार करीत आहेत.

Congress's test for self-reliance, let's all go alone! | काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, सर्वांचा एकला चलो रे चा सूर !

काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी, सर्वांचा एकला चलो रे चा सूर !

Next

अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्हा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायतच्या निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार नसल्याचे संकेत या पक्षांकडून दिले जात आहे. त्यामुळे २१ डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी काँग्रेससह राष्ट्रवादी व शिवसेनेने सुद्धा एकला चलो रे चा सूर आवळला असून त्या दृष्टीनेच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी करण्याचा कानमंत्र दिला आहे. तसेच याचाच ते वांरवार उच्चार करीत आहेत. त्यामुळे या निवडणुका महाविकास आघाडी करून लढण्यात त्यांना फारसा रस राहिलेला नसून त्यांनी स्वबळावरच या निवडणुका लढवून काय रिझल्ट येते, याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सुद्धा काँग्रेसच्या ताठर भूमिकेला भाव न देता आपली वेगळी चूल मांडत स्वबळावरच या निवडणुका लढविण्याची तयारी चालविली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीला घेवून चार पाच दिवसात काय घडामोडी घडतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर 
- कोविडमुळे मागील १६ महिन्यांपासून लांबलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. तर तीन नगरपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण या निवडणुकादेखील जाहीर झाल्या आहेत.
- जिल्हा परिषद निवडणुकानंतर पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक हाेऊ घातली आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून या निवडणुकांना महत्त्व आहे.
- तर सेवा सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सुद्धा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात काँग्रेसचा एकच आमदार
- गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा-गोरेगाव, आमगाव-देवरी, अर्जुनी मोरगाव असे चार विधानसभा मतदारसंघ आहे. यापैकी आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आ. सहषराम कोरोटे, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे, तिरोडा विधानसभा क्षेत्रात भाजपचे आ. विजय रहांगडाले आणि गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष आ. विनोद अग्रवाल हे पदारूढ आहेत. 
- सन २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचा प्रत्येकी एक एक आमदार निवडून आला. तर एक अपक्ष आमदार निवडून आला.
- तर सन २०१४ निवडणुकीत भाजपचे तीन आमदार आणि काँग्रेसचा १ आमदार निवडून आला होता. 

जि.प.मध्ये काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता 
- एकूण ५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेवर मागील पाच वर्ष काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. यात अध्यक्ष पद काँग्रेसकडे तर उपाध्यक्ष पद भाजपकडे होते. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस २०, काँग्रेस १६ आणि भाजपचे १७ सदस्य निवडून आले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समविचारी पक्ष एकत्रित येऊन जि.प.वर सहज सत्ता स्थापन करू शकले असते; पण बंगाल आणि गल्लीच्या वादात काँग्रेसने राष्ट्रवादीला जवळ करण्यापेक्षा कमळ हातात घेत जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्याला प्राधान्य दिले होते. 

पंचायत समित्यांत काँग्रेस दोन नंबरवर 
- गोंदिया जिल्ह्यात एकूण आठ पंचायत समित्या असून यातील एकूण सदस्यांची संख्या १०६ आहे. मागील निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ४२ उमेदवार निवडून आले होते. तर काँग्रेस ३२ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २९ उमेदवार निवडून आले होते. 
- मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष होता. एकूण ५३ पैकी २० उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, १६ काँग्रेस आणि १७ भाजपचे उमेदवार निवडून आले होते. 

 

Web Title: Congress's test for self-reliance, let's all go alone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.