राकाँ-काँग्रेसने सरकारची तिजोरी लुटली : बडोले
By Admin | Updated: June 26, 2015 01:34 IST2015-06-26T01:34:21+5:302015-06-26T01:34:21+5:30
केंद्र व राज्य शासन शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांकरिता अहोरात्र कार्य करीत आहे.

राकाँ-काँग्रेसने सरकारची तिजोरी लुटली : बडोले
गोंदिया : केंद्र व राज्य शासन शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांकरिता अहोरात्र कार्य करीत आहे. मात्र पूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने कोट्यवधीचे घोटाळे करुन शासनाची तिजोरी रिकामी केली. आम्ही घोटाळ्याचे साम्राज्य संपविले व घोटाळेबाजांना तुरुंगात टाकण्याचे काम सुरू केले, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
गोंदिया तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीत पक्ष उमेदवारांच्या ठिकठिकाणच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, तालुकाध्यक्ष नंदकुमार बिसेन, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा महामंत्री संतोष चव्हाण, दिनेश दादरीवाल, भाऊराव उके, संजय कुळकर्णी, शामलाल ठाकरे, राजा बन्सोड, रेखा लिल्हारे आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यावर आघाडी शासनाने थांबवून ठेवलेली अठराशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडन येथील घर व इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय घेवून सर्व प्रक्रिया पार पाडून घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण असल्याने २५० रुपये प्रतिक्विंटल बोनस देऊन दिलासा दिला. धानाला योग्य भाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रोजगारसाठी भरीव कार्य सरकार करीत आहे. जि.प. ने मागील पाच वर्षात प्रत्येक क्षेत्रात विकास कार्य करुन जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविला. आता विकासासाठी जि.प. व पं.स.मध्ये सत्ता येणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)