मिनी मंत्रालयावर काँग्रेस-भाजपचा कब्जा

By Admin | Updated: July 16, 2015 01:36 IST2015-07-16T01:36:56+5:302015-07-16T01:36:56+5:30

गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पुन्हा एकदा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला ठेवून भाजपला साथ देत अध्यक्षपद पदरात पाडून घेतले.

Congress-BJP occupation of mini ministry | मिनी मंत्रालयावर काँग्रेस-भाजपचा कब्जा

मिनी मंत्रालयावर काँग्रेस-भाजपचा कब्जा

राष्ट्रवादी काँग्रेसचा हिरमोड : अध्यक्षपदी काँग्रेसच्या उषा मेंढे, तर उपाध्यक्षपदी भाजपाच्या रचना गहाणे यांची निवड
गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या इतिहासात पुन्हा एकदा काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला बाजुला ठेवून भाजपला साथ देत अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. सर्वात कमी १६ सदस्यसंख्या असतानाही काँग्रेसच्या उषा मेंढे अध्यक्षपदी विराजमान झाल्या तर १७ सदस्यसंख्या असलेल्या भाजपच्या वाट्याला उपाध्यक्षपद आले. रचना गहाणे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात अतिशय औत्सुक्याच्या, काहीशा तणावपूर्ण आणि नाट्यमय घडामोडींच्या घटनाक्रमात झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडणुकीत अखेर सर्वाधिक २० जागा पटकावूनही राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागणार आहे.
दुपारी ३ ते ४.३० यादरम्यान जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे उषा मेंढे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजलक्ष्मी तुरकर तसेच भाजपकडून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी अर्ज भरले होते. तसेच उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून पी.जी. कटरे, राष्ट्रवादीकडून गंगाधर परशुरामकर आणि भाजपकडून रचना गहाणे यांनी दुपारी १ वाजेपर्यंत नामांकन भरले. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचे कामकाज सुरू झाले त्यावेळी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून सरिता रहांगडाले व रचना गहाणे यांनी तर उपाध्यक्षपदाच्या शर्यतीतून पी.जी.कटरे यांनी माघार घेतली.
दुपारी ३ वाजता निवडणुकीसाठी सभा सुरू होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य २.४० ला सभागृहात दाखल झाले. त्यापाठोपाठ भाजपचे सदस्य २.५५ ला तर काँग्रेसचे सदस्य ३ वाजता सभागृहाच्या दारावर पोहोचले. यावेळी भाजपचे आमदार विजय रहांगडाले, आ.संजय पुराम हेसुद्धा सभागृहाबाहेर उपस्थित होते.
या निवडणुकीत अध्यक्षपदाकरिता उषा मेंढे यांना ३३ तर राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर यांना २० मते पडली. उपाध्यक्षपदाकरिता भाजपच्या रचना गहाणे यांना ३० तर राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर यांना २० मते पडली. काँग्रेसचे सदस्य पी.जी.कटरे, विमल नागपुरे आणि रमेश अंबुले यांनी तटस्थ राहून उपाध्यक्षपदाकरिता कोणालाही मतदान केले नाही.
या मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर कार्यकर्त्यांसह कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी होती. पोलीस बंदोबस्तही चोख होता. (जिल्हा प्रतिनिधी)
आता काँग्रेस भाजपाविरूद्ध बोलणार का?
आतापर्यंत भाजप सरकारमधील घोटाळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेर काढून त्यांचा चेहरा चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप सरकारला धारेवर धरले. पण आता त्याच भाजपसोबत घरोबा करून काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले असून त्या भाजपविरूद्ध आता यांचा आवाज बाहेर निघेल का? अशी शंका या घडामोडीनंतर आयोजित पत्रपरिषदेत आ.राजेंद्र जैन यांनी व्यक्त केली. यावेळी संपूर्ण घटनाक्रमाचा तपशीलही त्यांनी पत्रकारांपुढे मांडला. यावेळी काँग्रेस आणि भाजपात कशी छुपी युती होती आणि त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचाही आदेश त्यांनी कसा झुगारला हे पुराव्यासह सांगण्यात आले. या पत्रपरिषदेला राष्ट्रवादीचे पर्यवेक्षक नरेश माहेश्वरी, माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, गप्पू गुप्ता, बबलू कटरे आदी उपस्थित होते.

Web Title: Congress-BJP occupation of mini ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.