तीन परीक्षा केंद्रांवर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:51 IST2017-03-15T00:51:04+5:302017-03-15T00:51:04+5:30
सर्वत्र दहावी बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे सुरू असताना सालेकसा तालुक्यात मंगळवारी तीन परीक्षा केंद्रांवर

तीन परीक्षा केंद्रांवर गोंधळ
गणिताच्या पेपरला दीड तास विलंब : हिंदीऐवजी मिळाली मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका
सालेकसा : सर्वत्र दहावी बोर्डाची परीक्षा सुरळीतपणे सुरू असताना सालेकसा तालुक्यात मंगळवारी तीन परीक्षा केंद्रांवर गणिताचा पेपर तब्बल दीड तास उशिरा सुरू करावा लागला. तिन्ही परीक्षा केंद्रावर हिंदी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकांऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्याने परीक्षा केंद्रासह संकलन केंद्रांवर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ११ वाजता सुरू होणारा पेपर १२.३० वाजता सुरू करण्यात आला. हा पेपर २.३० वाजता संपला.
सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील इतर परीक्षा केंद्रांवरून उरलेल्या प्रश्नपत्रिका जमा करुन आणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तरीसुध्दा प्रश्न पत्रिका कमी पडल्याने शेवटी दोन विद्यार्थ्यांमिळून एक प्रश्नपत्रिका अशी व्यवस्था करण्यात आली. एकाच ग्रुपचे दोन-दोन विद्यार्थी सोबत बसविण्याची व्यवस्था करण्यात आली. या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सालेकसा तालुक्यात एकूण आठ परीक्षा केंद्रांवर दहावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. यात साकरीटोला, मक्काटोला, तिरखेडी, सालेकसा येथील परीक्षा केंद्र मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याचे आहे. तसेच कावराबांध, सोनपुरी, पिपरीया, दरेकसा हे हिंदी माध्यमाचे आहेत. सालेकसा येथे दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्याचा समावेश असतो. परंतु मंगळवारी दि.१४ मार्चला गणित विषयाचा पहिला पेपर असताना केंद्र क्रमांक २१८१ पिपरीया हायस्कूल पिपरीया येथे सर्व पेपर हिंदीऐवजी मराठी माध्यमाचे निघाले. तसेच इतर केंद्रांवर निम्मे पेपर हिंदीऐवजी मराठी माध्यमाचे निघाले. त्यामुळे तिन्ही परीक्षा केंद्राव्ांर एकच तारांबळ उडाली.
१०.३० वाजतानंतर सर्व परीक्षार्थी आपआपल्या बैठक क्रमांकावर पेपर सोडविण्यासाठी बसले. त्यापाठोपाठ त्या-त्या वर्गातील पर्यवेक्षकसुध्दा उत्तरपत्रिका घेऊन वर्गात शिरले. इकडे केंद्र संचालक आणि अतिरीक्त केंद्र संचालकांनी प्रश्नपत्रिका काढण्यासाठी पाकीट फाडले असता इंग्रजी माध्यमाचे पेपर बरोबर निघाले, परंतु हिंदी माध्यमाच्या पेपरऐवजी मराठी माध्यमाचे निघाले.
हा प्रकार कावराबांध, पिपरिया, दरेकसा येथील तिन्ही केंद्रावर घडला. त्यामुळे तिन्ही ठिकाणच्या केंद्र संचालकांनी सालेकसा येथील कस्टडियन व गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर यांच्याशी संपर्क साधला. एकाच वेळी तिन्ही केंद्रावर सारखीच समस्या निर्माण झाल्याचे कळताच सर्वाची एकच तारांबळ उडाली. (तालुका प्रतिनिधी)
दोन विद्यार्थ्यांना एकच प्रश्नपत्रिका
हा गोंधळ दूर करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सालेकसा आणि सोनपुरी केंद्राव्ांर जाऊन तेथील उरलेल्या प्रश्नपत्रिका घेतला. तसेच गटशिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर यांनी आमगाव तालुक्यातील काही परीक्षा केंद्रावर जाऊन तेथील उरलेले पेपर संकलित करून आणले. या सर्व कामाला एक तास लोटला. तरी सुध्दा आवश्यक संख्येत प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या नाहीत. तेव्हा दोन विद्यार्थ्यांना एक प्रश्नपत्रिका अशी व्यवस्था करून दीड तास उशीराने परीक्षा सुरू करण्यात आला. यात बैठक व्यवस्था सुध्दा प्रभावीत झाली. परंतु शेवटी पेपर शांततेत पार पडला.
पिपरिया केंद्रावर सलग दुसरा गोंधळ
केंद्र क्रमांक २१८८१ पिपरिया हायस्कूल पिपरिया येथे सलग दोन पेपरात असा गोंधळ झाला आहे. दोन्ही दिवस एक ते दीड तास उशीराने पेपर सुरू झाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे इतर बाकी असलेल्या पेपरला पण असेच होणार नाही ना, अशी शंका केंद्र संचालकासह सर्वांना येत आहे. यापूर्वी हिंदीच्या पहिल्या पेपरला मराठीच्या प्रश्नपत्रिका आल्या होत्या, तेव्हा सुध्दा इतर केंद्रातून उरलेले पेपर बोलावून व्यवस्था करण्यात आली होती. परंतु पेपर उशीरा होण्यामुळे गैरप्रकाराला आमंत्रण देण्यासारखी परिस्थिती निर्माण होणारी असते. म्हणून संकलन केंद्रावरच प्रश्नपत्रिका तपासून घेण्याची व्यवस्था असावी, अशी मागणी काही केंद्र संचालक करीत आहेत.