दारूबंदीच्या सभेत गोंधळ

By Admin | Updated: September 30, 2015 05:20 IST2015-09-30T05:20:58+5:302015-09-30T05:20:58+5:30

दवनीवाडा येथे दारूबंदीसाठी आयोजित महिलांच्या विशेष सभेत ६२४ महिलांनी सहभाग घेतला. मात्र नियमानुसार

Confusion in the liquor market | दारूबंदीच्या सभेत गोंधळ

दारूबंदीच्या सभेत गोंधळ

गोंदिया : दवनीवाडा येथे दारूबंदीसाठी आयोजित महिलांच्या विशेष सभेत ६२४ महिलांनी सहभाग घेतला. मात्र नियमानुसार गावातील १३९२ महिला मतदारांपैकी ५० टक्के महिलांची मते दारूबंदीसाठी आवश्यक असल्याने येथे बाटली आडवी होऊ शकली नाही. मात्र गावकरी महिलांनी गावातील मतदार यादीच चुकीची असल्याचे सांगत गोंधळ घातला. या गोंधळातच ही सभा आटोपती घेण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, दवनीवाडा येथील ग्रामपंचायतच्या ठरावानुसार गावात पूर्णपणे दारूबंदी लागू करण्यासाठी मंगळवारी (दि.२९) सभा निश्चित केली होती. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांसह दवनीवाडयाचे ठाणेदार, गटविकास अधिकारी तसेच सरपंच तिजाबाई मस्करे, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, तंमुस अध्यक्ष भैयालाल सूर्यवंशी, महिला सभेच्या अध्यक्ष माजी पं.स.सदस्य सरस्वताबाई हेमने, दारूबंदी समितीच्या अध्यक्ष सुरेखा मुंडेले आदी उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभा सुरू झाली. मात्र मतदार यादीत गावातून स्थलांतरित झालेल्या आणि मृत झालेल्या मतदारांचीही नावे असल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यातच मतदान घेण्यात आले. त्यात ६२४ महिलांनी दारूबंदीच्या बाजुने मतदान केले. पण दारूबंदी लागू करण्यासाठी ६९४ (५० टक्के) मते मिळाली नाही. त्यामुळे महिलांनी गोंधळ घालत सभा तहकूब करण्याची मागणी केली. सभेच्या अध्यक्ष सरस्वताबाई हेमने यांनी ठरावावर स्वाक्षरीही करण्यास नकार दिला. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्याशी चर्चा केली असता अशा पद्धतीने सभा तहकूब करता येत नसून आज दारूबंदीचा ठराव बारगळल्याचे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

बेरडीपारमध्ये दारूमुक्तीचा संकल्प
बिर्सी फाटा : तिरोडा तालुक्यातील बेरडीपार खुर्शी येथे महिला शक्ती जागृत झाली असून त्यांनी गावाला व्यसनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या व दारुबंदी समितीच्या तसेच ग्रामपंचायत बेरडीपारच्या वतीने महिला मेळावा घेऊन दारूमुक्तीचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माधुरी रहांगडाले तर प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद उपाध्यक्ष ममता बैस, जिल्हा परिषद सदस्य रजनी सोयाम, पंचायत समिती सदस्य रमनिक सयाम, तहसीलदार रवींद्र चौहाण, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, मंदाकिनी गाढवे, माया पारधी, छबीलाल भाऊ पटले, सरपंच सरिता राणे, उपसरपंच रमेश साठवणे, पोलीस पाटील रतन खोब्रागडे उपस्थित होते. संचालन के.डी. भेलावे यांनी तर प्रास्ताविक पोलीस पाटील रतन खोब्रागडे यांनी केले. आभार प्रभाकर ठाकरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाठी दारुबंदी समितीच्या महिला अध्यक्ष अंजिरा साठवणे, उपाध्यक्ष कविता उईके, सचिव शामकला सावठणे व महिलांनी सहकार्य केले.

Web Title: Confusion in the liquor market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.