जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना प्रत्यक्षात होतेय साकार
By Admin | Updated: April 30, 2017 00:55 IST2017-04-30T00:55:38+5:302017-04-30T00:55:38+5:30
विजेची बचत करण्यासोबतच नैसर्गिक हवेत भर उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव देणारा गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा छतावरील तणसाचा प्रयोग ....

जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना प्रत्यक्षात होतेय साकार
तणसाचा प्रयोग : वीज बचतीसाठी अनेकांचा पुढाकार
गोंदिया : विजेची बचत करण्यासोबतच नैसर्गिक हवेत भर उन्हाळ्यातही गारव्याचा अनुभव देणारा गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांचा छतावरील तणसाचा प्रयोग आता अनेक जण करून पाहात आहेत. या प्रयोगातून त्यांना आलेले अनुभव आणि होणारी वीज बचत यामुळे प्रभावित झालेले लोक इतरांनाही हा प्रयोग करण्याचा सल्ला देत आहेत.
कडक उन्हापासून स्लॅबच्या घरांना वाचविणाऱ्या या अनोख्या प्रयोगाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर याबाबत अनेकांची उत्सुकता जागरूक झाली होती. त्यातूनच काही लोकांनी जिल्हाधकाऱ्यांच्या बंगल्याला भेट देऊन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जिल्हधिकाऱ्यांनीही तेवढ्याच उत्साहाने त्यांना ही माहिती देत हा प्रयोग शक्य आहे त्या सर्वांनीच करावा असे आवाहन केले.
गोंदियाच्या सिव्हील लाईनमधील डॉ.प्रशांत कटरे, दिनेश पटेल, श्याम चंदनकर, अभियंता विकास देशपांडे, आर्ट आॅफ लिव्हींगचे मनोज अग्रवाल आदींनी आपल्या घरावर धानाच्या तणसाचे आवरण टाकून त्यावर पाण्याचा मारा दिला. यामुळे त्यांचे घर एसी आणि कुलरशिवाय थंड होऊ लागले. त्यांना आपला हा अनुभव ज्यांच्यामुळे या प्रयोगाची प्रेरणा मिळाली त्या जिल्हधिकारी काळे यांना सांगितला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: त्यांच्या घरांना भेट देऊन पाहणी केली.
नाममात्र किमतीत मिळणारे हे तणस घरावर टाकण्यासाठी हवे असल्यास ते मोफत देण्याची तयारी बबलू चव्हण (९४०३३७४०४४) यांनी दर्शविली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)