प्राथमिक शाळांमधील संगणक धूळ खात
By Admin | Updated: December 2, 2014 23:09 IST2014-12-02T23:09:00+5:302014-12-02T23:09:00+5:30
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून संगणकाचे महत्व ओळखून वर्ग पहिली ते सातवीकरिता शाळेत संगणक उपलब्ध करून दिले. परंतु हे संगणक अनेक

प्राथमिक शाळांमधील संगणक धूळ खात
सालेकसा : महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून संगणकाचे महत्व ओळखून वर्ग पहिली ते सातवीकरिता शाळेत संगणक उपलब्ध करून दिले. परंतु हे संगणक अनेक शाळांत धूळखात असून आदिवासी नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यातील विद्यार्थ्यांना उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे.
वर्ग पहिली ते सातवीसाठी माहिती संप्रेक्षण तत्वज्ञान हा अनिवार्य विषय म्हणून अभ्यासक्रमात सहभागी करण्यात आलेला आहे. संगणक विषयात फक्त संगणकाचा अभ्यासच नव्हे तर संगणक प्रगतीचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना संगणक व तंत्रज्ञानाच्या वापरात पारंगत होणे आवश्यक आहे. यात इंटरनेटसह अनेक अप्लीकेशन अशा अनेक बाबींचा समावेश आहे. त्या सर्व बाबींचा सराव करण्यासाठी संगणकांना व इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे. पण अनेक शाळेत संगणक शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सराव करण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थी संगणकाच्या ज्ञाणाला मुकत आहेत.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळेतील विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. विद्युत बिले जास्त आल्यामुळे वीज मीटर काढण्यात आले आहे. संगणकांसाठी विद्युत पुरवठा होत नाही. त्यामुळे संगणक धूळखात राहण्याची पाळी शाळेत आलेली आहे. संगणक प्रयोगशाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याचे काम शाळेत अद्याप झालेले नाही.
आदिवासी नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत आरटीई (राईट टू एज्युकेशन) २००९ अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना सुखसुविधा पुरविणे आवश्यक आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गावची शाळा आमची शाळा या प्रकल्पाव्दारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हे उद्दिष्ट्य ठेवले आहे. असे असतानाही संगणक शिक्षणासाठी शिक्षक नाही. विद्युत बिल भरण्यासाठी शाळेकडे रुपये नाही, अशी अवस्था आहे.
गावच्या शाळेत मूल्यांकनातसुध्दा संगणकावर गुण देण्यात आलेले आहेत. तरी विद्यार्थ्यांना संगणकाचा उपयोग न होता ते धूळखात पडलेले असून याला जबाबदार कोण? शिक्षण विभाग की शाळा, असा प्रश्न निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)