तडजोडीचे राजकारण सुरू

By Admin | Updated: November 11, 2015 01:15 IST2015-11-11T01:15:38+5:302015-11-11T01:15:38+5:30

जिल्ह्यातील चार पैकी एकाही नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी तडजोडीशिवाय पर्याय नाही.

Compromise politics begin | तडजोडीचे राजकारण सुरू

तडजोडीचे राजकारण सुरू

नगर पंचायत : सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागील हालचालींना जोर
गोंदिया : जिल्ह्यातील चार पैकी एकाही नगर पंचायतीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापनेसाठी तडजोडीशिवाय पर्याय नाही. अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे या हालचालींना आता वेग आला असून कोण कोणासोबत जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सडक-अर्जुनीत बाहुबलीची गोची
सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी नगर पंचायत अध्यक्षपद अनु.जातीसाठी आरक्षित झाल्यामुळे अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. अनु.जातीचे नगर पंचायतीत चार उमेदवार निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या शशिकला विदेश टेंभुर्णे व रिता अजय लांजेवार असून भाजपकडे गिता राजेश शहारे व कॉंग्रेसकडे अजय रामलाल राऊत आहेत. याशिवाय बाहूबली विकास पॅनलचे चार उमेदवार निवडून आले असले तरिही त्यांच्याकडे एकही अनु. जातीचा उमेदवार नाही. त्यामुळे अध्यक्षपदाचे समिकरण ठरविण्यासाठी वेळ लागत आहे.
राष्ट्रवादीचे पाच, भाजपचे चार, कॉंग्रेसचे तीन, बाहुबलीचे चार आणि अपक्ष एक असे १७ संख्याबळ आहे. अशात राष्ट्रवादीला बाहूबलीचे समर्थन मिळाल्यास अध्यक्षपदासाठी रिता लांजेवार आणि शशिकला टेंभूर्णे यांच्यापैकी एकाची लॉटरी लागेल. भाजपसोबत एका अपक्षाला घेऊन बाहूबलीचे गठबंधन झाले तर गिता शहारे या नगराध्यक्ष होतील. अभय राऊत कॉंग्रेसचे एकमेव अनु. जातीचे उमेदवार असून कॉंग्रेसचे फक्त तीन सदस्य आहे. कॉंग्रेस जर जोडतोडचे राजकारण करण्यात यशस्वी झाली तर राऊत यांची अध्यक्षपदी वर्णी लागू शकते. तडजोडीच्या राजकारणात सडक-अर्जुनी मागे राहिले नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ््यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप की काँग्रेस?
गोरेगाव : नगर पंचायतमध्ये भाजपचे सहा, कॉंग्रेसचे पाच, अपक्ष चार व राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी लागणारे नऊ उमेदवार कोणत्याही पक्षाकडे नसल्यामुळे कोणत्याही एका पक्षाला दुसऱ्या पक्षाशी युती करून सत्तेचा उपभोग घेता येईल. आरक्षण सोडतीने गोरेगावात एकदा महिलाराज पहावयास मिळणार आहे.
भाजप येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असला तरी भाजपला दोन उमेदवारांशी हातमिळवणी करून सत्ता काबीज करता येईल. मात्र हे समिकरण बसविण्यासाठी भाजपकडे कुठलेही समीकरण नाही. कॉंग्रेस व अपक्ष मिळून कॉंग्रेसने सत्ता काबीज केली तर कॉंग्रेसच्या सीमा कटरे दावेदारी करू शकतात. भाजपच्या उषा रहांगडाले अपक्ष शामली जायस्वाल हे सुद्धा दावेदारीत आघाडीवर आहेत. मात्र कोणत्या पक्षाची कुणाशी युती होईल हे समिकरण स्पष्ट नाही.
अपक्षाच्या हाती खेळ
देवरी : नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झालेल्या देवरी नगर पंचायत अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडे उमेदवार आहेत. हेच प्रमुख दावेदारही आहेत. सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला एक तर भाजपला दोन सदस्यांची गरज आहे. काँग्रेस-भाजपची युती झाली तरी त्यांना एका अपक्षाची गरज भासणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारच सत्तेचा खेळ जुळविणार आहे. (जिल्हा/ तालुका प्रतिनिधी)

Web Title: Compromise politics begin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.