राष्ट्रीय लोक अदालतीत ८८ प्रकरणांत तडजोड
By Admin | Updated: July 30, 2016 00:08 IST2016-07-30T00:08:25+5:302016-07-30T00:08:25+5:30
वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावे

राष्ट्रीय लोक अदालतीत ८८ प्रकरणांत तडजोड
गोंदिया : वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित असलेले खटले सामोपचाराने व सामंजस्याने तात्काळ निकाली निघावे यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.ग.गिरटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय गोंदिया येथे मासिक राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात एकाच दिवशी ८८ प्रकरणांचा सामंजस्याने निपटारा करण्यात आला.
या तडजोडीमुळे अनेक वर्षांपासून वेळ आणि पैसा खर्च करणारे पक्षकार तसेच इतरांना होणारा मानसिक त्रास, आर्थिक त्रासातून सुटका मिळाली. यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यातील तालुका न्यायालयांमध्ये सर्वप्रकारच्या तडजोडपात्र न्यायप्रविष्ठ व पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणाकरीता तसेच पाणी, विद्युत, टेलिफोन व लोकोपयोगी पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणेही यात निकाली काढली. त्यात विद्युत, पाणी, टेलिफोन यांचे पूर्व न्यायप्रविष्ठ प्रकरणातील ज्या पक्षकारांनी तडजोडीप्रमाणे थकबाकीची पूर्ण रक्कम संबंधित विभागाला जमा केली त्यांची प्रकरणे कायमची संपविण्यात आली. यामुळे संबंधित विभाग व थकबाकीदारांचा भविष्यातील न्यायालयीन खर्च तसेच मानसिक त्रास वाचला.
प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी जिल्हा न्यायाधीश ए.एच.लध्दड, दिवाणी न्यायाधीश श्रीमती इशरत शेख, मुख्य न्यायदंडाधिकारी प्र.ह.खरवडे यांना तसेच पॅनलवरील वकील वीणा बाजपेई, अॅड.शबाना अंसारी, डॉ.सुनिता पिंचा, सामाजिक कार्यकर्ता डॉ.हरिश्चंद्र सलाम, प्रा.सुयोग इंगळे, सविता बेदरकर यांनी सहकार्य केले. तालुका न्यायालयामध्ये आमगाव दिवाणी न्यायाधीश ए.एस.देशमुख, तिरोडा दिवाणी न्यायाधीश आर.एस.पाजणकर, सडक/अर्जुनी दिवाणी न्यायाधीश व्ही.ए.साठे, अर्जुनी/मोरगाव दिवाणी न्यायाधीश एस.एल.रामटेके व देवरी येथे सहदिवाणी न्यायाधीश एस.शाहीद यांनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)