डिजिटलचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा- बडोले
By Admin | Updated: April 16, 2017 00:49 IST2017-04-16T00:49:58+5:302017-04-16T00:49:58+5:30
व्यवहारात पारदर्शकता आण िभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला आहे.

डिजिटलचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा- बडोले
गोंदिया : व्यवहारात पारदर्शकता आण िभ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला आहे. तसेच पंतप्रधानांचे स्वप्न डिजिटल इंडियाचे आहे. भीम अॅपच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी पाहिलेले डिजिटल इंडियाचे स्वप्न कॅशलेसच्या माध्यमातून पूर्ण करा, असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १३ एप्रिल रोजी बँक आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित डिजीधन मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे व जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिलकुमार श्रीवास्तव यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री पुढे म्हणाले, बँकांचे अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या मोबाईलवर भीम अॅप हे लोड केलेले नाही. यावरुन ते कॅशलेस व्यवहार करण्यास उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
बँकेत येणाऱ्या ग्राहकांशी हे अधिकारी व कर्मचारी चांगले वागत नसल्याबाबत पालकमंत्र्यांनी खेद व्यक्त केला.
जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेत ग्रामीण भागात पाहिजे तसे काम झाले नाही. सामान्य गरजू व बेरोजगारांना स्वावलंबी करण्याचे काम बँकांनी मुद्रा योजनेतून करावे. जिल्हा मागास, दुर्गम, नक्षलदृष्टया संवेदनशील असून जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला अशाप्रकारच्या योजनेतून हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.