विकासाची कामे वेळेत पूर्ण करा

By Admin | Updated: April 22, 2017 02:39 IST2017-04-22T02:39:11+5:302017-04-22T02:39:11+5:30

पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत करण्यात येणारी उपकेंद्राची कामे,

Complete developmental works in a timely manner | विकासाची कामे वेळेत पूर्ण करा

विकासाची कामे वेळेत पूर्ण करा

पालकमंत्री बडोले यांचे निर्देश : उर्जा विकास योजनांचा घेतला आढावा
गोंदिया : पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत करण्यात येणारी उपकेंद्राची कामे, उपकेंद्रांची क्षमता वाढ, नवीन रोहित्र, नव्या वाहिन्या व दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वीज जोडणीच्या कामासह अन्य ऊर्जा विकासाची कामे वीज वितरण कंपनीने वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी (दि.२०) पंडीत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना व एकात्मिक ऊर्जा विकास योजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते.
यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपवनसंरक्षक एस.युवराज, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता लिलाधर बोरीकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण मिहरे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, मागील सन २०१६-१७ या वर्षात वीज वितरण कंपनीने जिल्ह्याच्या ऊर्जा विकासाबाबत जिल्हा नियोजन समितीकडे पाच कोटी रु पयांची मागणी केली होती. त्यापैकी तीन कोटी रूपये मंजूर झाले होते. यातून मार्च २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यातील ६४ गावात ऊर्जा विकासाअंतर्गत पथदिव्यांची कामे करण्यात आली. सन २०१७-१८ या वर्षात वीज वितरण कंपनीने पाच कोटी रु पयांची मागणी केली आहे. त्यापैकी ३.५० कोटी रूपये मंजूर झाले असून यातून जिल्ह्यातील ७० गावात पथदिव्यांची कामे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
तर सन २०१७-१८ या वर्षात दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत ९६ कोटी आठ लक्ष रुपयांची कामे मंजूर असून या योजनेतून कृषी ग्राहकांना दर्जेदार व सुरळीत वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगत नामदार बडोले यांनी, जिल्ह्यात एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत २८ कोटी २० लक्ष रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आली असून या योजनेअंतर्गत गोंदिया व तिरोडा शहरातील विद्युत वितरण जाळ््यांचे सक्षमीकरण करण्यासाठी, तसेच तांत्रिक व व्यवसायीक वीज हानी कमी करण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्युत फिडर लाईन व ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पथदिव्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य देवून कामे करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.
आमदार रहांगडाले यांनी, दिवसेंदिवस विद्युत जोडणीची संख्या वाढत आहे. परंतू ट्रान्सफॉर्मरची क्षमता तीच कायम राहते. अशावेळी ट्रान्सफॉर्मरवर दाब येवून वीज पुरवठा खंडीत होतो. अशावेळी वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन देतांना ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून दयावी असे सांगितले. सभेला समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, तहसीलदार अरविंद हिंगे, अपर तहसीलदार के.डी.मेश्राम, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपअभियंता एस.आर.कायंदे, मेडाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र माडे यांचेसह अन्य अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Complete developmental works in a timely manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.