ग्रामसेवकासह पाच अधिकाऱ्यांची तक्रार
By Admin | Updated: December 11, 2014 23:09 IST2014-12-11T23:09:40+5:302014-12-11T23:09:40+5:30
जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. (ता.तिरोडा) येथे नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर झाले. त्यासाठी ८९ लाख ४४ हजार १७१ रूपये बांधकामासाठी मंजूर झाले.

ग्रामसेवकासह पाच अधिकाऱ्यांची तक्रार
परसवाडा : जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत करटी बु. (ता.तिरोडा) येथे नवीन नळ पाणी पुरवठा मंजूर झाले. त्यासाठी ८९ लाख ४४ हजार १७१ रूपये बांधकामासाठी मंजूर झाले. पण या योजनेच्या कामाला पूर्ण होण्याच्या आधीच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागून प्रकरण उघड झाले. या प्रकरणात करटी बु.च्या ग्रामसेवकासह पाच अधिकाऱ्यांविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ९५ नागरिकांच्या नावावर खोटी लोकवर्गनी दर्शवून चार लाख ५० हजार रुपये कंत्राटदारामार्फत भरण्यात आले. ३० नागरिकांनी लोकवर्गणीसाठी आपण एक रुपयासुद्धा दिले नाही. आपणास त्याबद्दल माहिती नाही, असे त्यांनी लेखी लिहून दिले आहे. ग्रामसेवक महाकाळकर यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. सहा भूवैज्ञानिक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणा गोंदिया यांनी प्रमाणपत्रांच्या टिपमध्ये नवीन विहीर नदीच्या काठावर खोदकाम करून बांधकाम करण्याचे आदेश दिले. पण सदर विहीर जुनीच असून नदीच्या पात्रात असून तिचेच स्त्रोत बळकट करण्याचे सांगितले. ती विहीर नदीपात्रात असल्याने गढूळ पाणी येत आहे.
सन १९९० च्या कालावधीत असलेल्या दोन जुन्या विहिरी नदीपात्रात आहेत. त्याच विहिरींनी पाणी पुरवठा सुरू आहे. भूवैज्ञानिक भूजल सर्व्हेक्षण अधिकारी यांनी शासनाची दिशाभूल केली आहे. यात प्रतिदिवस एक लाख ४४ हजार ६४० लिटर प्रतिदिवस पाण्याची मागणी नमूद आहे. विहिरीसाठी ११ लाख आठ हजार ४६८ रूपये मंजूर होते. पण काम न करता जुनी विहीर सन १९९० ची दाखवून सहा लाख ३४ हजार ३९४ रूपये काढण्यात आले. अंदाज पत्रकाप्रमाणे आयटम क्र. २, ५, ६१०, १९ व २० नुसार बांधकाम करणे आवश्यक आहे. तसे मोजमाप पुस्तिकेत नमूद केले आहे. पण विहीर तयार करण्यात आलीच नाही. आयटम क्र. २ मध्ये ५० हजार २४७ रूपये व चार लाख ७४ हजार ७४ रूपये अफरातफर करण्यात आले आहेत. यात पाईपलाईनसाठी मेन पाईप १४० मिमी डाय एचडीपीई ०८ केजीकरिता ३६ लाख ९५ हजार १६२ रूपये एवढे आहे. कंत्राटदाराला २५ लाख ६७ हजार ८२ रूपये देण्यात आले आहे. पण मोजमाप पुस्तिकेत नोंदीनुसार आयटम क्र.५- नग ४२०० दर ५७६ नुसार २४ लाख १९ हजार २०० रूपये एवढे आहे. यात एक लाख पाच हजार ४०८ रुपयांची अफरातफर झाली आहे.
नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. पण संपूर्ण गढूळ पाणी येत असून सन २०१०-११ मध्ये गढूळ पिण्याच्या पाण्यामुळे करटी बु. गावात डायरियाची साथ आली होती. सन २०१२-१३ मध्ये नवीन योजना मंजूर झाली. नवीन विहीर नदी काठावर बांधणे आवश्यक होते. पण तसे न करता पाण्याच्या पात्रात असलेल्या जुन्या विहिरीलाच दाखविण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदार, ग्रामसेवक, सरपंच, अध्यक्ष, सचिव, सदस्य ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, ग्रामपंचायत, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद यांची साठगाठ असल्याने भ्रष्टाचार झाला आहे.
सदर कामाची चौकशी करून या संपूर्ण अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ क्र.४९ कलम १७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रंजीत आर. बागडे करटी बु. यांनी पोलीस अधीक्षक गोंदिया, मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया, आयुक्त नागपूर, लोकआयुक्त मुंबई यांना लेखी तक्रार केली आहे. सर्व प्रकरण माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे. (वार्ताहर)