दोन गटात स्पर्धा, छोट्या शाळांना मिळाला पुरस्कार
By Admin | Updated: September 27, 2014 23:18 IST2014-09-27T23:18:20+5:302014-09-27T23:18:20+5:30
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेने दोन वर्षापासून सुरू केलेली गावची शाळा आमची शाळा या उपक्रमात पहिल्या वर्षी बऱ्याच त्रुट्या आढळल्याने जिल्हा परिषदेने दुसऱ्या

दोन गटात स्पर्धा, छोट्या शाळांना मिळाला पुरस्कार
गोंदिया : विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेने दोन वर्षापासून सुरू केलेली गावची शाळा आमची शाळा या उपक्रमात पहिल्या वर्षी बऱ्याच त्रुट्या आढळल्याने जिल्हा परिषदेने दुसऱ्या वर्षीसाठी या त्रुट्या दूर केल्या आहेत. यामुळे गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम दोन गटात राबविण्यात आला आहे. यामुळे वर्ग १ ते ४ च्या लहान शाळांनाही पुरस्कार मिळाला आहे.
ग्रामीण विद्यार्थ्याना भौतिक सुविधेसह दर्जेदार शिक्षण देण्यासाठी गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम जिल्हा परिषद गोंदियाने सुरू केला. या उपक्रमात जिल्हा परिषदेतील सर्व शाळांनी सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमात भाग घेणाऱ्या शाळांना प्रभाग, तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याची योजना अमंलात आणावी लागली. प्रत्येक स्तरावर प्रथम, व्दितीय, तृतीय असे पुरस्कार ठेवण्यात आले होते. परंतु जिल्हा परिषदेने यावर्षी सुधारित नियम तयार करून यावर्षी प्रत्येक स्तरावर दोनच पुरस्कार ठेवले आहेत.
पहिल्या वर्षी सरसकट एकाच गटात ही स्पर्धा असल्याने वर्ग १ ते ४ असलेल्या लहान शाळांवर अन्याय झाल्याची ओरड झाली होती. त्यामुळे हा अन्याय दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता हा उपक्रम राबविताना शाळांना दोन गटात पुरस्कार देण्याचे ठरविले आहे. १ ते ४ था वर्ग असलेल्या शाळांचा एक गट तर १ ते ७ वी असलेल्या शाळांचा दुसरा गट राहणार आहे. या प्रत्येक गटाला प्रभाग, तालुका व जिल्हास्तर असे प्रथम व व्दितीय असे पुरस्कार देण्यात येतात. वर्ग १ ते ४ साठी प्रभागस्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेला प्रथम ४ हजार तर व्दितीय येणाऱ्यास २५०० रुपये व स्मृतीचिन्ह, तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेला ९ हजार तर तालुकास्तरावर व्दितीय येणाऱ्या शाळेला ६ हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेला ३५ हजार व व्दितीय येणाऱ्या शाळेला २० हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे.
इयत्ता १ ते ७ वी असलेल्या शाळांना प्रभाग स्तरावर प्रथम पाच हजार, व्दितीय चार हजार व स्मृतिचिन्ह, तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या शाळांना १३ हजार तर व्दितीय येणाऱ्या शाळांना ९ हजार व स्मृतिचिन्ह, जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या शाळेला ४५ हजार तर व्दितीय येणाऱ्या शाळेला २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.
या मोहिमेचे वृत्तांकन करणाऱ्या बातमीदारांना तालुकास्तरावर ४ हजार रुपये प्रथम तर तीन हजार रुपये व्दितीय पुरस्कार देण्यात येतात. जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या पत्रकाराला ९ हजार तर व्दितीय येणाऱ्या पत्रकाराला ६ हजार रुपये देण्यात येते. जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार बाद केला आहे.
सोबतच पुरस्कार रक्कमही मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. या पुरस्काराची रक्कम इयत्ता १ ते ४ थी च्या गटावर खर्च केली जाणार आहे. सदर निर्णय जि. प. ने बैठकीत घेतला आहे. शाळांच्या दोन्ही गटासाठी २०० गुणांची प्रश्नावली किमान ८२ गुण तर १ ते ७ असलेल्या शाळांनी किमान ८३ गुण घेणे आवश्यक आहे. गावची शाळा आमची शाळा हा उपक्रम जि.प. शाळांची स्थिती दुधारत आहे.(तालुका प्रतिनिधी)