क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST2021-02-05T07:46:59+5:302021-02-05T07:46:59+5:30
देवरी : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासकामाकरिता आपण मला आमदार म्हणून निवडून दिले. मागच्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्याची ...

क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध
देवरी : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासकामाकरिता आपण मला आमदार म्हणून निवडून दिले. मागच्या वर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यामुळे कोणतीही विकास कामे करता आली नाहीत. परंतु परिस्थिती हळूहळू सावरत आहे. आणि आता आपल्या क्षेत्रात रेंगाळलेली अनेक विकास कामे पूर्ण होणार आहे. यावर्षी देवरी तालुक्यातील आदिवासी अति दुर्गम चिलंगटोला येथील रस्त्याकरीता १.४० कोटी रुपये, सालेकसा तालुक्यातील भजियापार येथील पुलाकरिता ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे आमगाव शहरातील रस्त्याकरिता ८१ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन हे काम युध्दस्तरावर सुरू आहे. मंजूर झालेल्या सर्व विकास कामाचे भूमिपूजन लवकर करुन या कामांना सुरुवात होणार आहे. देवरी शहराच्या विकासाकरिता मी दोन पावले पुढे जाऊन येथील आवश्यक विकास कामे मार्गी लावणार आहे. अशाप्रकारे क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाकरिता मी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
येथे सामाजिक कार्यकर्ता सीमा कोरोटे आणि तालुका महिला काँग्रेसच्यावतीने सोमवारी (दि.२५) आयोजित महिला मेळावा व संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित सामूहिक हळदीकुंकू कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटन जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे यांच्या तर दीप प्रज्वलन जिल्हा परिषदेच्या माजी सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहिवले, तालुकाध्यक्ष संदीप भाटिया, माजी नगरसेवक ओमप्रकाश रामटेके, माजी जि.प.सदस्य माधुरी कुंभरे, किरण राऊत, छब्बू उके, वंदना काळे उपस्थित होत्या.
पुढे बोलताना आमदार कोरोटे यांनी, आपला भाग हा धान उत्पादक क्षेत्राचा भाग आहे. येथे शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी सर्वसामान्य लोक राहतात. त्यांच्या मुला-मुलींनीही उच्चशिक्षण घेऊन डॉक्टर, वकील, इंजिनियर, आयपीएस व आयएएस व्हावे असे त्यांना वाटते. याकरिता खूप पैसा लागतो. अशात यावर्षीपासून बारावीच्या परीक्षेनंतर लगेच देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांकरीता जेईई, नीट, एमएचटीसीईटी, यूपीएससी व एमपीएससी या उच्च परीक्षांच्या मार्गदर्शनाकरीता आधार फाऊंडेशनतर्फे कोचिंग क्लासेसची सोय होणार आहे. याकरिता आधार फाऊंडेशनला १५ लाख रुपये देणार असून याचा लाभ या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे, असे सांगितले.
दरम्यान, महिला काँग्रेसच्यावतीने उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिलांकरिता संगीत खुर्ची व उखाणे स्पर्धाही घेण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी समाज कल्याण सभापती संतोष मडावी यांनी आपल्या धर्मपत्नींसोबत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रास्ताविक तालुका महिलाध्यक्ष सुभद्रा अगडे यांनी मांडले. संचालन जिल्हा महिला अध्यक्ष उषा शहारे यांनी केले. आभार माधुरी कुंभरे यांनी मानले.