७७८ एनएचएम कर्मचाऱ्यांना एक वर्षासाठी दिलासा
By Admin | Updated: April 12, 2017 01:13 IST2017-04-12T01:13:03+5:302017-04-12T01:13:03+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कंत्राट ३१ मार्च २०१७ पर्यंत केंद्रशासनाने दिला होता.

७७८ एनएचएम कर्मचाऱ्यांना एक वर्षासाठी दिलासा
मुदतवाढ मिळाली : समान काम समान वेतनाला मात्र तिलांजली
गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कंत्राट ३१ मार्च २०१७ पर्यंत केंद्रशासनाने दिला होता. परंतु हा कंत्राट पुन्हा एक वर्षाने वाढवून ३१ मार्च २०१८ केला आहे. राज्यात २० हजाराच्या घरात या कर्मचाऱ्यांची संख्या असून गोंदिया जिल्ह्यात ७७८ कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
सन २००७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या नावाने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमात कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जात होती. केंद्रशासनाने या कर्मचाऱ्यांना ३१ मार्च २०१७ पर्यंत ठेवून त्यानंतर हा उपक्रम सुरू राहील की बंद राहील. या संदर्भात निर्णय घेऊ असे सूचविले होते. ३१ मार्च जवळ येताच कर्मचाऱ्यांमध्ये भिती व उत्सुकता शिगेला पोहोचली होती. शेवटी ३१ मार्च रोजी एक वर्षाचा कंत्राट वाढल्याचे पत्र धडकले. परिणामी वर्षभरासाठी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात व राज्य आरोग्य विभागाच्या विविध ठिकाणी डॉक्टर, परिचारीका, अधिपरिचारीका, स्टॉफ, नर्स, औषध निर्माण अधिकारी, टेक्नीशियन, समन्वय असे विविध पदांवर कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नंतर शासनाने एनआरएचएम (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) मधील ग्रामीण हा शब्द वगळून एनएचएम म्हणजेच (राष्ट्रीय आरोग्य अभियान) असे नाव ठेवले. जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ८३४ पदे मंजूर असून ७७८ पदे भरलेली आहेत. तर ५६ पदे रिक्त आहेत.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत २५९ एनएचएमची पदे मंजूर असून २५१ पदे भरली आहेत. तर ८ पदे रिक्त आहेत. एलएचव्हीची २१ पदे मंजूर असून सर्व भरलेली आहेत. स्टॉफ नर्सची १४ पदे मंजूर असून १० पदे भरलेली आहेत. तर ४ पदे रिक्त आहेत. सोबतच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात ३८ डॉक्टरांची पदे मंजूर असून पूर्ण भरलेली आहे. आरोग्य सेविकेची १९ पदे मंजूर असून पूर्ण भरलेली आहे. औषध निर्माण अधिकारी म्हणून १९ पदे म्हणून सर्व भरलेली आहे. सोबतच आयपीएचएस आरोग्य संस्थेत विशेषतज्ञ, लॅब टेक्नीशियन, डॉक्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी समान काम, समान वेतन द्या व कायम करा अशा मागणीला घेऊन राज्यभरात आंदोलन केले होते. गोंदिया जिल्ह्यात केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष सुनील तरोणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. (तालुका प्रतिनिधी)
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे समान काम, समान वेतन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे असताना अद्याप याचा लाभ आम्हाला देण्यात येत नाही. वैद्यकीय सेवा व प्रसूती रजा नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्यात यावी.
- संजय दोनोडे
सचिव, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटना.