कोकणा झाले स्मार्ट ग्राम
By Admin | Updated: May 2, 2017 00:30 IST2017-05-02T00:30:24+5:302017-05-02T00:30:24+5:30
लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यात यशस्वी राहीलेले गोंदिया जिल्ह्यात सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोकणा हे गाव स्मार्ट ग्राम म्हणून पुढे आले आहे.

कोकणा झाले स्मार्ट ग्राम
गोंदिया : लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा विकास करुन पर्यावरणाचा समतोल राखण्यात यशस्वी राहीलेले गोंदिया जिल्ह्यात सडक-अर्जुनी तालुक्याच्या कोकणा हे गाव स्मार्ट ग्राम म्हणून पुढे आले आहे.
गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरण, जतन व संरक्षण करून समृध्द व संपन्न गावाची निर्मिती करण्याचा दृष्टीने राज्यात २०१०-११ या वर्षात पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना अमंलात आणली. परंतु या योजनेत नोव्हेंबर २०१६ मध्ये स्मार्ट ग्राम नावाने चालविण्यात येत आहे. लोकसहभागातून पर्यावरणाचा समतोल राखणे, समृध्द ग्राम निर्माण करणे, राज्य शासनाच्या विविध विभागाशी ग्रामस्तरीय योजनांची सांगड घालणे, समन्वय साधणे, नव्या उपक्रमाची अमंलबजावणी करणे या सर्व निकषात सडक-अर्जुनी तालुक्याचा कोकणा हे गाव सर्वाधिक गुण घेऊन स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात आपले नाव लौकिक केले आहे.
स्वमुल्यांकन करून २५ टक्के ग्राम पंचायती तालुकास्तरावर स्मार्ट ग्रामच्या स्पर्धेत उतरल्या. स्पर्धेतील निकष लक्षात घेऊन तालुका स्पर्धेत असलेल्या गावांचे मूल्यांकन करण्यात आले. यात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक येणाऱ्या गावाला प्रत्येकी १० लाखाचे बक्षीस देण्यात आले. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या गावांना जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम च्या स्पर्धेत ठेवण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील कारंजा, तिरोडा तालुक्यातील बोदा, आमगाव तालुक्यातील रामाटोला, सालेकसा तालुक्यातील गांधीटोला, देवरी तालुक्यातील जेठभावडा, गोरेगाव तालुक्यातील पाथरी, सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दाभना ही गावे स्पर्धेत होती. १० ते १३ एप्रिल दरम्यान झालेल्या मुल्यांकणात कोकणा स्मार्ट ग्राम उद्यास आले. (तालुका प्रतिनिधी)
५० लाखातून होणार कायापालट
जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामच्या स्पर्धेत असलेल्या कारंजाला ५८.५, बोदा ५६.५, रामाटोला ७५, गांधीटोला ५९, जेठभावडा ७५, पाथरी ७०, कोकणा ७८ व दाभणा ६२ गुण मिळाले. तालुकास्तरावरचा १० लाखाचा पुरस्कार व जिल्हास्तरावरचा ४० लाखाचा पुरस्कार असे ५० लाख रुपये पुरस्कारापोटी कोकणा या गावाला मिळाले असून पुरस्काराच्या रकमेतून कोकणा या गावाचा कायापालट होणार आहे.