कोळशाची उघड्यावरील वाहतूक प्रवाशांच्या अंगलट

By Admin | Updated: May 15, 2015 00:48 IST2015-05-15T00:48:25+5:302015-05-15T00:48:25+5:30

दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवाशी गाड्यांसह मालगाड्यासुद्धा धावतात.

Coach Traffic Traffic | कोळशाची उघड्यावरील वाहतूक प्रवाशांच्या अंगलट

कोळशाची उघड्यावरील वाहतूक प्रवाशांच्या अंगलट

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्ये रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवाशी गाड्यांसह मालगाड्यासुद्धा धावतात. या मालगाड्यांमध्ये बहुसंख्य दगडी कोळसा वाहून नेणाऱ्या असतात. मात्र कोळसा ताडपत्री किंवा प्लास्टीकने झाकला नसल्याने कोळशाचे कण विरूद्ध दिशेने धावणाऱ्या प्रवाशी गाडीत तसेच लहानमोठ्या स्थानकावरील प्रवाशांच्या डोळ्यात शिरतात. हा प्रकार मात्र त्यांच्या अंगलट येत असून त्यामुळे डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे मार्गावर दिवसभरात शेकडोच्या संख्येने प्रवाशी रेल्वेगाड्या धावतात. सध्या लग्नसराईचे दिवस असल्यामुळे या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अनेक प्रवाशी उभे राहूनच आपला प्रवासाचा टप्पा गाठतात. तसेच कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यासुद्धा या रेल्वे मार्गाने मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. तिरोडा येथे अदानी पॉवर प्लांट असल्यामुळे तेथे सुद्धा मालगाड्यांनी मोठ्या प्रमाणात कोळसा नेला जातो. मात्र कोळसा वाहून नेताना ताडपत्री किंवा प्लास्टीक झाकले जात नाही. लहान-मोठ्या आकाराच्या कोळशासह कोळशाची चुरीसुद्धा मालगाडीवरच असते. कोळसा भरलेली मालगाडी धावत असली आणि विरूद्ध दिशेने एखादी प्रवाशी रेल्वेगाडी येत असली तर मालगाडीवरील कोळशाचे कण वाऱ्याच्या तीव्र गतीने परिसरात उडत सुटतात. तर अन्य गाड्यांत शिरून प्रवाशांच्या डोळ्यात, कानात व नाकात हे कण शिरतात. यातूनच त्यांना डोळे, कान व नाकाचे आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिलासपूर ते नागपूर रेल्वेमार्गावर अनेक लहान-मोठे रेल्वे स्थानक आहेत. या स्थानकांत अनेक प्रवाशी गाड्या तांत्रिक समस्येमुळे काही काळ थांबलेल्या असतात. तसेच अनेक स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवाशी आपल्या गाडीची वाट पाहत बसून असतात. अशा स्थानकावरून कोळसा वाहून नेणारी मालगाडी धावत गेली की त्यातून उडणारे कोळशाचे कण डोळ््यात व श्वसानातून शरिरात प्रवेश करतात. या प्रकारामुळे प्रवाशांना मोठाच त्रास होत आहे. अशात रेल्वे प्रशासनाने कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांना मजबूतपणे ताडपत्री, प्लास्टीक किंवा तत्सम वस्तू बांधण्याचे आदेश दिले किंवा तशी उपाययोजना केली तर ते प्रवाशी सुरक्षेच्या दृष्टीने तसेच चोरीवर आळा घालण्यासाठी महत्वपुर्ण ठरणार. (प्रतिनिधी)

Web Title: Coach Traffic Traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.