विविध मुद्यांवर गाजली शिक्षकांची सहविचार सभा

By Admin | Updated: March 22, 2017 01:25 IST2017-03-22T01:25:17+5:302017-03-22T01:25:17+5:30

येथील पंचायत समिती खंडविकास अधिकारी अशोक खाडे यांनी तालुक्यात कार्यरत शिक्षकांच्या संघटनांची सहविचार सभा बोलावून समस्या निवारणासंबंधी

Co-ordination meeting of teacher on various issues | विविध मुद्यांवर गाजली शिक्षकांची सहविचार सभा

विविध मुद्यांवर गाजली शिक्षकांची सहविचार सभा

बीओंना धारेवर धरण्याचा प्रयत्न : शिक्षकांनी मांडल्या व्यथा
सालेकसा : येथील पंचायत समिती खंडविकास अधिकारी अशोक खाडे यांनी तालुक्यात कार्यरत शिक्षकांच्या संघटनांची सहविचार सभा बोलावून समस्या निवारणासंबंधी विविध मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला. सदर तक्रार निवारण सभा धमाकेदार ठरली असून काही महत्वाच्या मुद्यावर शिक्षकांनी तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनेक विषयांना घेऊन पंचायत समितीचे सभागृह चांगलेच गाजले.
तक्रार निवारणार्थ आयोजित सहविचार सभा बीडीओ अशोक खाडे यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली असून यावेळी पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, गट शिक्षणाधिकारी वाय.सी.भोयर, शिक्षण विस्तार अधिकारी एन.पी.चिखलोंडे, के.एस.धुवाधपाडे, अधीक्षक कोहळे, शिक्षण विभागातील लिपीक वर्ग तसेच शिक्षक संघटनेचे तालुका व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यात विशेष करून प्राथमिक शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व इतर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ज्या ज्वलंत व प्रलंबित मुद्यावर सभा गाजली त्यात पहिला डीसीपीएस धारकांची आॅफलाईन कपात झालेली रक्कम व शासनाचा हिस्सा यांच्या नोंदी व हिशेब हा होता. यावर बीडीओ यांनी शिक्षण विभागाचे मार्गदर्शन घेऊन त्वरीत सर्व त्रुट्या दूर करण्याचे निर्देश देताना एप्रिलपर्यत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दुसरा मुद्दा सेवा पुस्तकात नोंदी घेण्यासंबंधीचा असून याबाबत एका महिन्यात सर्व केंद्रांचे कॅम्प आयोजित करून पूर्ण करण्याचे सांगितले. अन्यथा लिपीकाचे वेतन थांबविण्यात येतील असेही म्हणाले.
तिसरा मुद्या ग्राम कहाली येथील जि.प.शाळेतील स.शिक्षक यांच्या समायोजनाच्या असून बीईओ यांनी कोणतीही चौकशी न करता व कार्यालयीन नोटशीट न टाकता नियमबाह्य त्यांना दुसऱ्या शाळेत पाठविल्याचा आरोप लावण्यात आला. यावर समिती नेमून योग्य तपासणी करण्याचे आश्वासन देण्यात आले. चौथ्या मुद्यात सतीश दमाहे यांना कारणे दाखवा नोटीस, सातगावचे मुख्याध्यापक बारई आणि गांधीटोलाचे मुख्याध्यापक यांची बीईओ भेटी दरम्यान लावण्यात आलेली गैरहजेरी असून त्याच बरोबर भेटी दरम्यान उशिरा येणाऱ्या शिक्षकांच्या वेतन कपातीचा होता. याबद्दल सभा खूपच गाजली व बीईओंनी शिक्षकांची बाजू न ऐकून घेता हेतुपुरस्सर कारवाई केल्याचे दिसून आले.
यावर बीडीओ यांनी प्रती उत्तर देताना, भविष्यात अशा प्रकारे पगार कपात करता येणार नाही, तसेच मागील कपात केलेला पगार काढण्याचे आश्वासन दिले. पाचवा मुद्या अर्जित रजा व मेडीकल प्रवास भत्ता बद्दलचा राहीला असून आजपर्यंत यासंबंधी यातील अनेक रजा नियमबाह्य सध्या घेऊन करण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावर बीडीओंनी शिक्षकांना उद्देशून बोलताना सर्वांनी सहनशीलता ठेवून वाममार्गाचा उपयोग न करण्याचा सल्ला दिला. सहावा मुद्दा चार टक्के सादील खर्च गणवेश रक्कम पोषण आहार मानधन व इंधन खर्चाचा होता. यावर जि.प.कडून मागणीचे आश्वासन देण्यात आले.
या व्यतिरीक्त अवघड क्षेत्रात गावांना समाविष्ट करणे, निवड श्रेणी प्रशिक्षण व चटोपाध्याय प्रशिक्षण या बाबत लिपीकांची चुक झाल्यामुळे प्रशिक्षणात मुकणे तसेच इतर मुद्दे मांडण्यात आले.
सभेचे संचालन राजेश जैन यांनी केले तर आभार प्रदर्शन मेश्राम यांनी केले. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा महासचिव एल.यू.खोब्रागडे, पतसंस्थेचे संचालक सुरेश कश्यप, संदीप तिडके, तालुका अध्यक्ष सतीश दमाहे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात टी.आर.लिल्हारे, आर.एस.बसोने, आर.एस.वानखेडे, एम.एस.मोहारे, ओ.एच.लिल्हारे, डी.एच.उके, के.टी.ढोलवार, डी.बी.बरैय्या, पी.एम.ढेकवार, जयेश लिल्हारे, पी.पी.नागपुरे, के.झेड.लिल्हारे आदी शिक्षक सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Co-ordination meeting of teacher on various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.