लोकसहभागासाठी सहकारी संस्था सरसावल्या
By Admin | Updated: June 8, 2015 01:28 IST2015-06-08T01:28:51+5:302015-06-08T01:28:51+5:30
लोकसहभागाच्या तत्वावर आधारीत जलयुक्त शिवार अभियानाच्या मदतीला जिल्ह्यातील सहकारी संस्था सरसावल्या असून त्यांनी चक्क दोन हजार तास कामाचे नियोजन केले आहे.

लोकसहभागासाठी सहकारी संस्था सरसावल्या
गोंदिया : लोकसहभागाच्या तत्वावर आधारीत जलयुक्त शिवार अभियानाच्या मदतीला जिल्ह्यातील सहकारी संस्था सरसावल्या असून त्यांनी चक्क दोन हजार तास कामाचे नियोजन केले आहे. या कामांतर्गत गाळ काढणे व खोलीकरणाची कामे जेसीबीच्या माध्यमातून केली जात आहेत. यात जेसीबीच्या भाड्यासाठी येणारा खर्च या सहकारी संस्था वहन करून अभियानातील लोकसहभागाच्या संकल्पनेला मुर्त रूप देत आहेत.
राज्यात दर दोन वर्षानंतर काही भागात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. याकरिता राज्य शासनाने ‘सर्वांसाठी पाणी-टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९’ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ९४ गावांची निवड करण्यात आली आहे.
लोकसहभाग या तत्वाला केंद्र स्थानी धरून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व सक्षम सहकारी संस्थांच्या माध्यमातून लोकसहभाग या तत्वांतर्गत जलयुक्त शिवार अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना केले होते. यावर जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व सक्षम सहकारी संस्थांशी संपर्क साधून त्यांना अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांत हातभार लावण्यास सांगीतले होते.
जिल्हा उपनिबंधकांच्या आवाहनावरून जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या व सहकारी संस्थांनी अभियानाच्या मदतीसाठी पुढाकार घेत दोन हजार तास कामाचे नियोजन केले. यात या संस्थांकडून अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांमधील गाळ काढणे व खोली करणाची कामे हाती घेण्यात आली आहेत.
ही कामे जेसीबीच्या माध्यमातून केली जाणार असून जेसीबीच्या भाड्याचा खर्च या संस्था वहन करणार आहेत. यातील काही कामे करण्यात आली असून काही कामे सुरू आहेत. (शहर प्रतिनिधी)