शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालये बंद
By Admin | Updated: July 28, 2016 00:04 IST2016-07-28T00:04:55+5:302016-07-28T00:04:55+5:30
ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत असलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी, शंभर टक्के शिष्यवृत्ती नियमित देण्यात यावी

शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालये बंद
ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद
गोंदिया : ओबीसी विद्यार्थ्यांची थकीत असलेली शिष्यवृत्ती देण्यात यावी, शंभर टक्के शिष्यवृत्ती नियमित देण्यात यावी व व्यावसायिक अभ्याक्रमासाठी नाकारलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी या प्रमुख मागणीला घेऊन आज (दि.२७) रोजी जिल्ह्यातील कनिष्ट महाविद्यालय व महाविद्यालयांनी बंद पुकारला होता.
महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित राष्ट्रव्यापी आंदोलनाला सहकार्य करण्यासाठी ओबीसी संघर्ड कृती समिती आणि ओबीसी सेवा संघाचे गोंदिया जिल्ह्यात या बंदचे आवाहन केले होते. सघटनेने ओबीसी समाजासाठी केंद्र सरकारची १०० टक्के मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात यावी, नॉनक्रिमिलेयरची अट रद्द करावी, ओबीसीच्या लोकसंख्येच्या आधारावर अर्थसंकल्पात तरतूद करावी, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय सुरू करावे, केंद्र व राज्यावर शिष्यवृत्ती थकीत आहे ती त्वरीत देण्यात यावी, उच्च शिक्षणात ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, जात पडताळणी प्रमाणपत्राच्या समितीत ओबीसी अधिकारी असावा, तालुका व जिल्हास्तरावर ओबीसी वसतीगृह तयार करावे अश्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. आमगाव व सालेकसा तालुक्यातील कनिष्ट महाविद्यालय व महाविद्यालयात कडकडीत बंद होता. आंदोलनाचे नेतृत्व बबलू कटरे, बी.एम. करमकर, विनायक येडेवार, राजेश नागरिकर, अमर वऱ्हाडे, गणेश बर्डे, मनोज शरणागत, लिल्हाधर गिऱ्हेपुंजे, डॉ. सजंय देशमुख, रमेश चुटे, सागर काटेखाये, कृष्णा ब्राम्हणकर व जिल्ह्यातील इतर ओबीसी बांधवांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. (तालुका प्रतिनिधी)
या महाविद्यालयांचा पुढाकार
गोंदिया एज्युकेशन सोयटीतर्फे जिल्ह्यात जेवढे कनिष्ट महाविद्यालय व वरिष्ट महाविद्यालय आहेत ते बंद ठेवण्यात आले. सोबतच समर्थ विद्यालय तिगाव, सुभाष हायस्कूल डोंगरगाव, डॉ. आंबेडकर कनिष्ट महाविद्यालय डोंगरगाव, महाविद्यालय लोहारा, नूतन हायस्कूल पुराडा, योगराजसिंग कनिष्ट महाविद्यालय चुटीया, जि.प. हायस्कूल व कनिष्ट महाविद्यालय आमगाव, विद्या निकेतन कनिष्ट महाविद्यालय आमगाव, इंदिराबेन पटेल कनिष्ट महाविद्यालय आमगाव, हरिहरभाई पटेल कनिष्ट महाविद्यालय चिरचाळबांध व सितेपार येथील कनिष्ट महाविद्यायाने या आंदोलनात पुढाकार घेतला.
आमगाव व सालेकसात १०० टक्के बंद
आमगाव व सालेकसा तालुक्यातील कनिष्ट व वरिष्ठ महाविद्यालय कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. गोंदिया एज्युकेशन सोयटीतर्फे जिल्ह्यात जेवढे कनिष्ट महाविद्यालय व वरिष्ट महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी स्वयं स्फूर्तीने बंद ठेवण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली.