ग्राहक न्यायमंचाचा निवाडा : नुकसान भरपाईसह तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश

By Admin | Updated: August 13, 2015 02:17 IST2015-08-13T02:17:55+5:302015-08-13T02:17:55+5:30

ट्रॅक्टर-ट्रॉली खरेदी करून कर्जाची नियमित फेड करणाऱ्या ग्राहकाला आरटीओ कार्यालयातून वाहन पासिंग करून रीतसर नोंदणी न करणाऱ्या स्टार सोनालिका सेंटर,

Client Judgment Judgment: Order to pay the cost of the complaint with the compensation | ग्राहक न्यायमंचाचा निवाडा : नुकसान भरपाईसह तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश

ग्राहक न्यायमंचाचा निवाडा : नुकसान भरपाईसह तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश

मोदी ग्रुपला ग्राहक मंचचा झटका
गोंदिया : ट्रॅक्टर-ट्रॉली खरेदी करून कर्जाची नियमित फेड करणाऱ्या ग्राहकाला आरटीओ कार्यालयातून वाहन पासिंग करून रीतसर नोंदणी न करणाऱ्या स्टार सोनालिका सेंटर, मोदी ग्रुपला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने चांगलाच झटका दिला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायमंचाने स्टार सोनालिका सेंटर मोदी ग्रुपला २५ हजार रूपये नुकसानभरपाई, १० हजार रूपये तक्रारीचा खर्च व ३० दिवसांच्या आत ट्रॉलीची नोंदणी करून देण्याचे आदेश दिले.
अशोक घनश्याम टेंभरे रा. खैरबोडी (ता. तिरोडा) असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांनी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर व ट्रॉली स्टार सोनालिका सेंटर मोदी ग्रुप यांच्याकडून ६ लाख २१ हजार रूपयांत विकत घेतले. त्यांनी टाटा सुमो गाडी एक्स्चेंज करून डाऊन पेमेंट म्हणून ३ लाख २१ रूपये व उर्वरित तीन लाख रूपये मॅग्मा फायनांस कंपनीद्वारे दिले. एका महिन्यानंतर आरटीओ पासिंग झाली काय? अशी वारंवार विचारणा करूनही पासिंग करणे मोदी ग्रूपने टाळले. त्यामुळे टेंभरे यांनी वकिलामार्फत नोटिस पाठविली. यावर पासिंग झाल्याचे उत्तर मिळाले. मात्र आरटीओ कार्यालयातून पासिंग झाले नसल्याचे कळले. त्यामुळे त्यांनी ग्राहक न्यायमंचात धाव घेतली.
न्यायमंचाने स्टार सोनालिका सेंटरला नोटीस बजावल्यावर त्यांनी आपला लेखी जबाब नमूद केला. त्यात त्यांनी सर्व बाबी स्वीकार केल्या. तसेच २२ नोव्हेंबर २०१२ रोजी आरटीओ गोंदिया येथून पासिंग करण्यात आले असून त्याचा क्रमांक (एमएच ३५/जी-६१९७) असल्याचे नमूद केले.
मात्र ग्राहक टेंभरे यांनी टाटा सुमोची एनओसी २४ नोव्हेंबर २०१२ पर्यंत दिल्याने व आरटोओच्या धोरणानुसार ३१ आॅगस्ट २०१२ नंतर ट्रॉली पासिंग बंद झाल्यामुळे ट्रॉली पासिंग न झाल्याचे जबाबात नमूद केले.
यावर ग्राहक न्यायमंचाने कारणमीमांसा केली. यात वाहन विक्रेत्याने वाहन विकल्यावर वाहनाची नोंदणी करूनच वाहन मालकाच्या ताब्यात देण्यात यावे, अशी तरतूद मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ४२ मध्ये नमूद आहे. मात्र वाहनाची नोंदणी न करता विक्रेत्याने वाहन मालकाच्या ताब्यात दिल्याने मोटार वाहन नियमाचा भंग झाला आहे. तसेच डाऊन पेमेंटसाठी एक्सचेंज म्हणून दिलेली टाटा सुमोची एनओसी ३१ आॅगस्ट २०१२ पूर्वी सादर करावे अन्यात ट्रॉलीची पासिंग आरटीओमार्फत होणार नाही, अशा आशयाचे पत्र पुरावा म्हणून स्टार सोनालिका सेंटर, मोदी ग्रूपने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी दाखल केले नाही. त्यामुळे न्यायमंचाने ग्राहक टेंभरे यांची तक्रार अंशत: मान्य केली.
तसेच स्टार सोनालिका सेंटर मोदी ग्रुपने ग्राहक टेंभरे यांच्या ट्रॉलीची नोंदणी आरटीओ कार्यालयातून ३० दिवसांच्या आत करून द्यावी व ट्रॉलीच्या नोंदणीचा संपूर्ण खर्च करावा, सेवेतील त्रुटीमुळे ग्राहक टेंभरे यांना झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रूपये, तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार रूपये द्यावे व सदर आदेशाचे पालन ३० दिवसांच्या आत करावे, असा आदेश न्यायमंचाने स्टार सोनालिका सेंटर मोदी ग्रुपला दिला. (प्रतिनिधी)
वकिलांनी असा केला युक्तिवाद
ग्राहक टेंभरे यांचे वकील अ‍ॅड. रहांगडाले यांनी असा युक्तिवाद केला की, ट्रॅक्टर-ट्रॉली विकत घेताना आरटीओ पासिंगसाठी २० हजार रूपये तसेच सर्व कागदपत्र दिले होते व मोदी ग्रूपने पासिंगची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र पासिंग करून न दिल्याने त्यांनी सेवेत त्रुटी केली. त्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करण्याचा युक्तिवाद केला. तर स्टार सोनालिका सेंटरचे वकील अ‍ॅड. शरद बोरकर यांनी, टाटा सुमोची एनओसी ३१ आॅगस्ट २०१२ पर्यंत न दिल्याने व त्यानंतर ट्रॉलीची पासिंग बंद झाल्याने तक्रार खारिज करावी, असा युक्तिवाद केला.

Web Title: Client Judgment Judgment: Order to pay the cost of the complaint with the compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.