नाल्यांची स्वच्छता रखडली

By Admin | Updated: June 20, 2015 01:41 IST2015-06-20T01:41:43+5:302015-06-20T01:41:43+5:30

मागील चार दिवसांपासून परिसरात चांगले पाऊस येत आहे. गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याही बनविल्या आहेत.

Cleanliness of drains | नाल्यांची स्वच्छता रखडली

नाल्यांची स्वच्छता रखडली

खातिया : मागील चार दिवसांपासून परिसरात चांगले पाऊस येत आहे. गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याही बनविल्या आहेत. मात्र नाल्यांची स्वच्छता अद्याप करण्यात न आल्याने नाल्यांतील पाणी मध्येच थांबून असते. त्यामुळे घरांच्या भिंती कमजोर होत आहेत. ही समस्या गोंदिया तालुक्यातील खातिया, बिर्सी व अर्जुनी गावांत दिसून येत आहे.
पाऊस येण्यापूर्वी गावातील नाल्यांची सफाई करण्याचे शासनाचे निर्देश असतात. तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी पावसाळ्यापूर्वीच नाल्यांची स्वच्छता करणे गरजेचे असते. परंतु खातिया येथे या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नाल्यांच्या स्वच्छतेअभावी पाणी एकाच ठिकाणी थांबून असते. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होत आहे व विहिरींचे पाणीसुद्धा दूषित होत आहे. त्यामुळे बोअरवेल्सच्या पाण्याचा वापर केला जात आहे. गावातील एक बोअरवेल दीड महिन्यापासून बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दुसरीकडे धाव घ्यावी लागत आहे.
पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. संबंधित प्रशासनाने नाल्यांच्या स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. २२ व २३ जूनला जोरदार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी व बंद पडलेल्या बोअरवेलची सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी खातियावासियांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Cleanliness of drains