कचारगडला ‘ब’ वर्ग धार्मिक पर्यटनाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 00:11 IST2017-02-27T00:11:55+5:302017-02-27T00:11:55+5:30

तमाम आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र पारीकोपार लिंगो माँ कंकाली देवस्थान कचारगड

Class 'B' class religious tourism status of Kachargad | कचारगडला ‘ब’ वर्ग धार्मिक पर्यटनाचा दर्जा

कचारगडला ‘ब’ वर्ग धार्मिक पर्यटनाचा दर्जा

तमाम आदिवासींचे श्रद्धास्थान : संजय पुराम यांच्या प्रयत्नांना यश
सालेकसा : तमाम आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र पारीकोपार लिंगो माँ कंकाली देवस्थान कचारगड (धनेगाव)ला ‘ब’ वर्ग धार्मिक पर्यटनाचा दर्जा देण्यात आल्याची माहिती आ.संजय पुराम यांनी दिली. जिल्ह्यात एका यात्रेत सर्वाधिक लोक भेट देत असलेल्या कचारगडला ब दर्जा मिळाल्यामुळे येथे विकास कामे करण्याचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे. विशेष म्हणजे ब वर्गाचे धार्मिक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळविणारे कचारगड हे गोदिया जिल्ह्यातील एकमेव स्थळ ठरले आहे.
समस्त आदिवासी समाजासाठी श्रद्धास्थान असणाऱ्या कचारगडची महती सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणली. त्यामुळे विदर्भातून आणि महाराष्ट्रातूनच नाही तर विविध राज्यातील आदिवासी समाजबांधवांची येथे माघ पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त दरवर्षी गर्दी वाढतच आहे. यावर्षी येथे येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या ७ लाखांवर गेल्याची माहिती आहे.
नैसर्गिकरित्या तयार झालेली आशिया खंडातील सर्वात मोठी गुहा असल्यामुळे कचारगडबद्दल आदिवासी समाजासोबत इतरांनाही कुतूहल असते. त्यामुळे हे ठिकाण ब वर्ग धार्मिक पर्यटनस्थळ व्हावे यासाठी आमदार संजय पुराम यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या विनंती पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने २३ जानेवारी २०१७ नुसार ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. यापूर्वी कचारगड देवस्थान ‘क’ वर्गात येत होते. सामाजिक जबाबदारी लक्षात घेता कचारगडच्या विकासाकरिता आपण सदैव प्रयत्नरत राहणार असून रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शुद्ध पाणी यात्रेकरुंना मिळावे म्हणून पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार असल्याचे आ.पुराम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भोजनगृहाचे काम सुरू असून यात्रेकरुंना थांबण्याकरिता सभागृहासाठी ५ कोटी रुपये निधी ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. पालकमंत्र्यांनीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी करावयाच्या कामांची अंदाजपत्रके सादर करण्याबाबत कार्यकारी अभियंता यांना पत्र देण्यात आले आहे.
‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यामुळे कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे, सचिव संतोष पंधरे, बारेलाल वरकडे, सरपंच पूरा वरकडे, शंकर मडावी, मनोज इळपाते, विरेंद्र उईके, मनिष पुसाम, मुकेश इनवाते, रामदास मडावी, चुन्नीलाल मरस्कोले, टेकाम, जि.प. सदस्य विजय टेकाम व इतर आदिवासी बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

Web Title: Class 'B' class religious tourism status of Kachargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.