तिरोड्यात बंद, गोंदियात फज्जा
By Admin | Updated: December 18, 2015 02:15 IST2015-12-18T02:15:56+5:302015-12-18T02:15:56+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.

तिरोड्यात बंद, गोंदियात फज्जा
गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगारांच्या पगारवाढीच्या झालेल्या करारात अनेक त्रुटी असून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्यात यावरून वाढलेल्या असंतोषाचा भडका उडत गुरूवारी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला. मात्र या संपाचा परिणाम जिल्ह्यातील दोनपैकी केवळ तिरोडा आगारात दिसून आला. गोंदिया आगारातील बसफेऱ्या नेहमीप्रमाणे सुरू होत्या. त्यामुळे गोंदिया आगारात या संपाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
लगतच्या भंडारा जिल्ह्यातील एसटीच्या पवनी, साकोली, तुमसर तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आगाराचे कामकाज १०० टक्के बंद होते. भंडारा आगारातील कामकाम ५० टक्के बंद होते तर गोंदिया आगारातील बसगाड्या पूर्णपणे सुरू होत्या. मागील वर्षी गोंदिया आगारातील ज्या कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला होता, त्या कर्मचाऱ्यांचा एका दिवसासाठी आठ दिवसांचा पगार कपात करण्यात आला होता. याच पगार कपातीचा धसका गोंदिया आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतल्याने ते आंदोलनात सहभागी झाले नाही. मात्र सर्वच कामगारांचे सहकार्य मिळाले तर शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारण्याची शक्यता असल्याचे कामगारांशी केलेल्या चर्चेत त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस ही संघटना राज्यभर कार्यरत आहे. याशिवाय राज्यभरात एसटी कामगारांच्या १७ संघटना आहेत. गोंदिया आगारात कामगारांच्या पाच संघटना आहेत. या पाचही संघटनांमध्ये पगार कपातीची भीती असल्याने त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे टाळले. ज्यांचा पगार कमी आहे, अशा कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांचा सदर आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
गोंदिया आगाराच्या बसफेऱ्या शुक्रवारी बंद ठेवण्याचा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये म्हणून स्कूल बसेस सुरू ठेवण्यास प्राधान्य देवू, इतर फेऱ्यांचा नंतर विचार केला जाईल. मात्र हे सर्व कामगारांवर अवलंबून आहे, अशी माहिती गोंदिया आगाराच्या अधिकाऱ्यांनी दिली. गुरूवारी गोंदिया आगाराच्या केवळ दोन फेऱ्या सुरूवातीला रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र काही वेळाने त्यासुद्धा अपडेट करण्यात आल्या. दरम्यान सरकारने मागण्यांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास शुक्रवारी हा बंद आणखी तीव्र होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)
बसच्या काचा फोडल्या
गुरूवारी गोंदिया आगाराच्या बसेस सर्वच दिशेने सोडण्यात आल्या. मात्र साकोली आगार १०० टक्के बंद असल्याने व ठिकठिकाणी आंदोलनकर्ते असल्याने बसेस रिकाम्याच परतल्या. साकोली, बिर्सी फाटा, सौंदड, सेंदूरवाफा टोल नाक्यावरून गोंदिया आगाराच्या बसेस रिकाम्याच्या परत पाठविण्यात आल्या. साकोलीजवळ गोंदिया आगाराच्या एका बसच्या काचासुद्धा फोडण्यात आल्याचे गोंदिया आगाराकडून सांगण्यात आले.
तिरोडा आगाराचे होणार ३.५ लाखांचे नुकसान
सन २०१२ ते २०१६ साठी जो कामगार करार झाला, तो रद्द करून सन २०१२ ते २०१६ या कालावधीसाठी २५ टक्के पगारवाढीचा करार करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी एसटीच्या कामगारांनी संप पुकारला. तिरोडा आगारातील कामगारांनी संपाला उत्तम प्रतिसाद दिल्याने तेथील सर्वच बसफेऱ्या बंद होत्या. चालक संपात सहभागी तर वाहक आॅन ड्युटी आणि वाहक संपावर तर चालक आॅन ड्युटी, असा प्रकार तिरोडा आगारात गुरूवारी घडला. त्यामुळे तिरोडा आगाराच्या बसेस धावू शकल्या नाही. या प्रकारामुळे एका दिवसात तिरोडा आगाराला साडेतीन लाख रूपयांचे नुकसान सहन करावे लागेल, असे सूत्रांनी सांगितले.