सिव्हील लाईन्सचे वाजले की बारा
By Admin | Updated: March 14, 2015 01:26 IST2015-03-14T01:26:45+5:302015-03-14T01:26:45+5:30
प्रभाग क्रमांक ६ मधील मुख्य परिसर म्हणजे सिव्हील लाईन्स आहे. एखाद्या शहरातील सिव्हील लाईन्स परिसर म्हटला की, डोळ््यापुढे सर्व सुविधायुक्त पॉश परिसराचे चित्र येते.

सिव्हील लाईन्सचे वाजले की बारा
कपिल केकत गोंदिया
प्रभाग क्रमांक ६ मधील मुख्य परिसर म्हणजे सिव्हील लाईन्स आहे. एखाद्या शहरातील सिव्हील लाईन्स परिसर म्हटला की, डोळ््यापुढे सर्व सुविधायुक्त पॉश परिसराचे चित्र येते. येथे मात्र त्या विपरीत परिस्थिती आहे. शहरातील सिव्हील लाईन्समध्ये चालायला धड रस्ते नाही, सांडपाणी व कचऱ्याने तुटल्या-फुटल्या नाल्या, जागोजागी कचऱ्याचे ढिगार व त्यावर डुकरांचा वावर, दुर्गंधीने श्वास घेणे कठिण अशी स्थिती असून येथील सिव्हील लाईन्सचे बारा वाजले आहे. येथील रस्त्यांबाबत तर न बोललेलेच बरे. नेहरू चौकातून सिव्हील लाईन्सची सुरूवात होत असून येथे पाय ठेवताच जोरदार दचक्याने येणाऱ्याचे स्वागत होते. आत शिरल्यानंतरचे चित्र तर अविस्मरणीयच आहे.
प्रभाग क्रमांक ६ मधील सर्वात महत्वाचा परिसर मानला जातो तो सिव्हील लाईन्स. भावना कदम हा परिसर बघतात. नेहरू चौकातून या प्रभागाची सुरूवात होते. त्यामुळे नेहरू चौकात पाय ठेवताच उखडलेल्या रस्त्यांंमुळे दचक्यांना सुरूवात होते. सुरूवातीपासून मामा चौक या शेवट पर्यंत हे दचके संपत नाही. मुख्य मार्गाची गत एवढी दयनीय झाली आहे की आता आतल्या रस्त्यांबाबत बोलणे बरी नाही. परिसरातील काही रस्त्यांचे बांधकाम झाले असल्याने थोडाफार दिलासा आहे. शहरातील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरच्या रांगेत नाली नसल्याने सांडपाणी साचल्याचे चित्र आहे. पुढे इंगळे चौक रस्त्यावर तर थोडीफार नाली असून त्यानंतर बांधकाम तसेच सफाईच्या अभावाने नाल्या बुजून गेल्या आहेत. मामा चौक पर्यंत तर रस्ता उखडला असल्याने दचके खातच सिव्हील लाईन्सवासीयांचा दिवस निघतो व संपूनही जातो. काही रस्त्यांच्या कडेला पेवींग ब्लॉक लावण्यात आले आहेत. मात्र त्यामुळे रस्त्यांवरील दचके संपत नाहीत अशी प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. नगरसेविका कदम यांच्या घराच्या मागच्या परिसरात रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगार दिसून आले. दुर्गंधीमुळे येथे श्वास घेणे कठिण होते. येथील काही नागरिकांनी नगरसेविका आठ दिवसांतून दिसत असून सफाई होत असल्याचे सांगीतले. मात्र कचरा उचलला जात नसल्याची तक्रार केली. रेल्वे लाईन परिसरातील नाल्यात गाळ साचला असून त्यातच डुकरांचा वावर दिसून आला. कचऱ्याचे ढिगारही ठिकठिकाणी दिसले. नुरी चौकातील रस्त्यांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सफाई व रस्त्यांची समस्या गंभीर आहे.
प्रभागातील बाजार परिसर व गणेशनगर परिसर नगरसेवक अशोक गुप्ता बघतात. नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहीलेले गुप्ता यांची ही दुसरी रेजीम आहे. त्यामुळे त्यांना कामाचा अनुभव आहे. मात्र त्यांच्या परिसरात बघितले असता समस्या अधिक आहेत. जागोजागी नाल्या सांडपाणी व कचऱ्याने भरलेल्या आहेत. कचरा व घाणीच्या समस्येने नागरिक त्रस्त आहेत. रहिवासी भाग असलेल्या गणेशनगर परिसरातही रस्ते व नाल्यांची समस्या गंभीर आहे. नाल्या तुटलेल्या आहेत त्यामुळे बांधकामाची गरज आहे. मुख्य मार्गावरील गुरूनानक गेट लगतचा रस्ता उखडलेला असून दचके व धुळीने नागरिक त्रस्त झाले आहेत. एलआयसी समोरच्या गल्लीत नाल्या सांडपाण्याने तुंबलेल्या आहेत. नगरसेवकांचे दर्शन दुर्लभ झाल्याचे येथील नागरिकांनी सांगीतले. शुभमंगल कार्यालयालगत नालीत मोठ्या प्रमाणात कचरा भरून आहे. पुढे इंडेन गॅस एजंसीच्या बाजूच्या नालीतील सांड पाणी रस्त्यापर्यंत भरले आहे. बी.जे.हॉस्पीटल जवळचा रस्ता खराब आहे. विविध समस्यांमुळे नागरिक त्रस्त असून या परिसरातही मोठ्या प्रमाणात रस्ते व नाल्यांच्या बांधकामाची गरज दिसून आली.