शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ
By Admin | Updated: December 27, 2014 22:54 IST2014-12-27T22:54:41+5:302014-12-27T22:54:41+5:30
मुख्य मार्गावर अस्ताव्यस्त वाहतूक व ठिकठिकाणी पार्किंग केलेली वाहने दिसून येतात. गेल्या काही वर्षात शहरात वाहनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकाजवळ वाहन

शहरात वाहतुकीचा बट्ट्याबोळ
गोंदिया : मुख्य मार्गावर अस्ताव्यस्त वाहतूक व ठिकठिकाणी पार्किंग केलेली वाहने दिसून येतात. गेल्या काही वर्षात शहरात वाहनांमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकाजवळ वाहन आल्यामुळे शहरात वाहतुकीच्या शिस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने अपघाताच्या संख्येतही वाढ झाल्याचे दिसून येते.
शहरात वाहनांची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. शालेय विद्यार्थ्यांजवळही वाहने आली आहेत. परंतु त्या तुलनेत सुरक्षित वाहने चालविण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सध्या शहरातील वाहतूक अतिशय जोखमीची ठरत आहे. बालाघाट ते पुढे आमगाव व गोरेगावकडे जाणारा मुख्य मार्ग हा शहरातून जातो. आमगावहून देवरी होत छत्तीसगड तर बालाघाट मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. बालाघाट मार्गावरील ग्राम नागरा ते आमगाव मार्गावरील फुलचूरपर्यंत तसा शहरी भाग व रहिवासी क्षेत्र असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. असात खासगी प्रवासी वाहनांची अधिकची भर पडते. अशावेळी वाहतूक पोलीस मात्र बघ्यांची भूमिका घेताना दिसून येतात.
शहरातील मरारटोली बस स्थानक, नेहरू चौक, जयस्तंभ चौक परिसर आदी ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा ठिय्या असतो. अतिशय बेशिस्तीत येथे वाहनांची गर्दी हमखास दिसून येते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा चांगलाच त्रास होतो. येथील जसस्तंभ चौकात तर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कार्यालयासमोरच प्रवासी वाहनांचा गराडा असतो व त्यापासून अडथळा होत असूनही पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. हप्ता वसुलीच्या माध्यमातून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून मोठी रक्कम नियमतिपणे मिळत असल्यामुळे पोलिसांची या वाहनांवर कारवाई करण्याची हिम्मत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. नियोजनशून्य पोलीस व्यवस्थेमुळे नागरिकांना मात्र जोखिम स्वीकारून रस्त्याने ये-जा करावी लागते.
उल्लेखनीय म्हणजे महिला व विद्यार्थी वर्गाला या अस्ताव्यस्त वाहतुकीचा फटका सहन करावा लागतो. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेच्या निरीक्षकांना विचारले असता ते मनुष्यबळाची कमतरता तसेच नगर परिषदेचे असहकार्य ही कारणे सागंतात. एकंदर केवळ आपल्या अंगावरील घोंगडे दुसऱ्याच्या अंगावर टाकणे एवढा एकच प्रकार विविध शासकीय विभागांकडून सुरू असून जनतेच्या सोयीचा मात्र सर्वांनाच सोईस्कररीत्या विसर पडल्याचे दिसून येते. शहरात वाढत्या अवैध वाहतुकीमुळे व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी व महिलांना चांगलीच कसरत करीत रस्त्याने जावे लागते. याबाबत नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे. विद्यार्थी व सर्वसामान्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले असून पोलिसांचा वाहतूक विभाग नेमका काय करतो, असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. वाहतूक विभागाची कार्यप्रणाली तशी नेहमीच वादग्रस्त आहे. वाहतूक पोलीस दुचाकी चालकांवर आपला जोर आजमावतात. गाडीसमोर आडवे होऊन गाड्यांची चाबी काढून घेण्या इतपत वाहतूक पोलीस धजावले आहेत. दुचाकीवाले दिसले की त्यांना कागदपत्र विचारून थेट चालान किंवा १०० ची नोट घेऊन सोडले जाते. सध्या हा प्रकार सर्वच चौकांत दिसून येत आहे. वाहतूक पोलीस चौका चौकांत दिसून येत असून या रस्ताने निघाल्यास प्रत्येक चौकात नियुक्त कर्मचारी चालान फाडताना हमखास दिसून येत आहे. त्यांचा हा पराक्रम मात्र फक्त दुचाकीवाल्यांसाठीच आहे. तर चारचाकी वाहनांच्या झेडी कुणीही जात नाही. बाजारात चालायला रस्त्यावर जागा राहत नाही. अशात एखादी दुचाकी रस्त्यावर दिसली की तिला उचलून नेले जाते. मात्र चारचाकी उभी पाहून वाहतूकीला त्रास होत असला तरिही कुणी त्याकडे लक्ष देताना दिसत नाही. यातून वाहतूकीचे नियम फक्त दुचाकीवाल्यांसाठीच आहेत काय असा सवाल आता शहरवासी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी वाहतूक शाखेने दुकानदारांचे अतिक्रमण काढले. मात्र ही मोहिम आता थंडावली आहे. अशात चार दिन की चांदनी सारखाच हा प्रकार दिसून येतो. (शहर प्रतिनिधी)