४५ दिवसानंतर उघडली शहरातील बाजारपेठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:00 IST2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:50+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जीवनावश्क वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने मागील ४५ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे व्यावसायीकांमध्ये सुध्दा काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण होते. दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाकडून कधी ग्रीन सिग्नल मिळते याकडे त्यांच्या नजरा लागल्या होत्या.

४५ दिवसानंतर उघडली शहरातील बाजारपेठ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देण्याचा निर्णय घेतला. याच अंतर्गंत आठवड्यातून बुधवार, गुरूवार, शुक्रवार हे तीन दिवस काही दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. या आदेशानुसार तब्बल ४५ दिवसांच्या कालावधीनंतर शहर आणि ग्रामीण भागातील बाजारपेठ बुधवारी (दि.६) उघडली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर आणि बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांची वर्दळ होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी २४ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जीवनावश्क वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्वच दुकाने मागील ४५ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे व्यावसायीकांमध्ये सुध्दा काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण होते. दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाकडून कधी ग्रीन सिग्नल मिळते याकडे त्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर केंद्र सरकारने विविध जिल्ह्यांचे रेड, आॅरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभाजन केले. ग्रीन आणि आॅरेंज झोनमध्ये व्यवहार सुरू करण्यास काही प्रमाणात शिथिलता देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने काही व्यवहारांना शिथिलता देण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.
त्यानुसार शहर आणि ग्रामीण भागातील व्यावसायीक प्रतिष्ठाने उघडण्यास तीन दिवसांकरिता परवानगी दिली आहे. त्यामुळे बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. बुधवारी सकाळी ८ वाजतपासून शहरातील बाजारपेठ उघडली. कापड, जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रानिकसह इतर वस्तूंची दुकाने उघडली. तर सलून व स्पॉ व मद्य विक्रीची दुकाने उघडण्याची परवानगी अद्याप देण्यात आली नव्हती. दुकानांमध्ये गर्दी होणार नाही यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी दुकानांसमोर वर्तुळ आखण्यात आले होते.
तसेच प्रत्येक दुकानांसमोर सॅनिटायझर ठेवण्यात आले होते. तब्बल ४५ दिवसांच्या कालावधीनंतर दुकाने उघडल्याने ग्राहकांची सुध्दा काही प्रमाणात रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. तर सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत तीन दिवस दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्याने व्यावसायीकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहयला मिळाले.
गर्दीमुळे वाढला धोका
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील काही दुकाने वगळता तीन दिवस बाजारपेठ उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार बुुधवारी सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत शहरातील बाजारपेठेतील दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून आली. गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, नेहरु पुतळा, नगर परिषद या परिसरातील रस्त्यांवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. तर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग सुध्दा न पाळल्याने कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.
पोलिसांची नजर
जिल्हा प्रशासनाने शहरातील व्यावसायीक प्रतिष्ठाने आठवड्यात तीन दिवस सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या कालावधीत दुकानांमध्ये गर्दी होवून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व व्यावसायीकांना सोशल डिस्टन्सिंगसाठी दुकानांसमोर वर्तुळ आखण्याचे आणि सॅनिटायझर ठेवण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे पालन केले जावे यासाठी पोलिसांचे पथक नियुक्त करण्यात आले असून ते यावर नजर ठेवून होते. शिवाय व्यावसायीकांना लाऊड स्पिकरवरुन सूचना देत होते.