गोंदिया शहर होणार गचकेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 01:48 IST2017-04-28T01:48:32+5:302017-04-28T01:48:32+5:30

गोंदिया शहरातील रस्ते म्हणताच जीवाला धडकी भरते. या रस्त्यांवरून जाताना बसणाऱ्या गचक्यांमुळे जीव वर-खाली होतो.

The city of Gondia will be free of gachakas | गोंदिया शहर होणार गचकेमुक्त

गोंदिया शहर होणार गचकेमुक्त

पाच कोटींच्या कामांना मंजुरी : रस्त्यांचेही बांधकाम होणार
गोंदिया : गोंदिया शहरातील रस्ते म्हणताच जीवाला धडकी भरते. या रस्त्यांवरून जाताना बसणाऱ्या गचक्यांमुळे जीव वर-खाली होतो. अवघ्या शहरातील रस्त्यांच्या दुर्गतीने शहरवासीयांच्या दिवसाची सुरूवात गचके खात होते. मात्र शहरवासीयांना या गचक्यांपासून थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण नगर परिषदेने नुकतेच पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली असून यात रस्त्यांचेही बांधकाम केले जाणार आहे.
आजघडीला अवघ्या शहरालाच रस्त्यांचे ग्रहण लागले आहे. शहरातील प्रत्येकच भागातील रस्ते आज उखडले असून त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. हीच परिस्थिती शहरात सर्वत्र दिसून येत असल्याने ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ असे म्हणण्याऐवजी अवघे ‘शहरच्ड्ड्यात’ असे म्हटले जात आहे. रस्त्यांच्या या दुर्गतीमुळे शहरवासी पार हादरले असून त्यांच्या दिवसाची सुरूवात व शेवट दररोज रस्त्यांच्या दचक्यांनी होतो. वाहनचालकांचे तर सोडाच मात्र धड पायी चालतानाही पाय अडखळून पडण्याएवढी येथील रस्त्यांची स्थिती जर्जर अवस्था झाली आहे.
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या गोंदिया शहराला लागलेला हा मोठा कलंक आहे. शहरातील रस्त्यांची स्थिती बघून प्रत्येकालाच आश्चर्य वाटते. शिवाय बाहेरगावावरून आलेल्यांसाठी येथील रस्त्यांचा हा विषय गोंदियावासीयांची टिंगल करण्यासाठी आयता विषय असतो. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती बदलणार असल्याची चिन्हे दिसून येत असून शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याचेही दिसून येत आहे.
नगर परिषदेने पाच कोटींच्या कामांना मंजुरी दिली असून यात रस्त्यांच्या कामांचाही समावेश आहे. या कामांची निविदा झाली असून वर्क आॅर्डरची प्रक्रीया सुरू आहे. पावसाळ््यापूर्वी ही कामे आटोपण्याचे नगर परिषदेचे नियोजन आहे. यातून शहरातील प्रत्येकच प्रभागातील रस्त्यांचे सिमेंटीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. याशिवाय अन्य कामांचाही यात समावेश असून नागरिकांना पावसाळ््यात सुविधा व्हावी यासाठीही कामे केली जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)

प्रमुख रस्त्यांसाठी ११ कोटींचा निधी
नगर परिषदेच्या पाच कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे केली जाणार आहेच. यात प्रभागातील रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. मात्र शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती घनशाम पानतवने यांनी दिली. या निधीतून शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंटीकरण केले जाणार आहे. हे स्स्ते तयार झाल्यास शहरवासीयांची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे. असे झाल्यास शहरवासीयांची रस्त्यांच्या दचक्यांपासून कायमची सुटका होणार.
बांधकाम दर्जेदार होण्याची गरज
शहरातील रस्त्यांच्या बांधकामाबाबत काही न बोलण्याचीच गरज आहे. बांधकामाची गुणवत्ता येथील रस्त्यांची स्थिती बघूनच सर्वांच्या नजरेत येते. शाळेतल्या एखाद्या पोरालाही रस्त्याची स्थिती समजणार. मात्र हे चित्र शहरातील लोकप्रतिनिधी व संबंधीत अधिकाऱ्यांन कसे दिसत नाही, असे आता शहरवासी बोलत आहेत. रस्त्यांचे बांधकाम केले जाते. मात्र बांधकामाची गुणवत्ता नसते व रस्ते काही दिवसांतच उखडतात. त्याची डागडुजी केली जाते व यावरही पैसा ओतला जातो. मात्र पुन्हा स्थिती जैसे थे होते. एकंदर फक्त पैशांचा नासाडा होत आहे. त्यामुळे आता जनतेच्या पैशांचा नासाडा होऊ नये यासाठी रस्त्यांच्या बांधकामावर नियंत्रण असावे अशी मागणी आता शहरवासी करीत आहेत.

Web Title: The city of Gondia will be free of gachakas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.