रस्त्यांच्या खोदकामाने शहरवासी त्रस्त
By Admin | Updated: May 19, 2014 23:39 IST2014-05-19T23:39:36+5:302014-05-19T23:39:36+5:30
वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी सध्या शहरातील रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी हे खोदकाम केले जात

रस्त्यांच्या खोदकामाने शहरवासी त्रस्त
गोंदिया : वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी सध्या शहरातील रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. पाणी पुरवठा योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी हे खोदकाम केले जात असून यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत. मागील वर्षभरा पासून हा प्रकार सुरू असून यामुळे शहरवासीयांना वाहन चालविताना त्रास होत आहे. एवढेच नव्हे तर रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. शहराला चोवीस तास पाणी पुरवठा व्हावा यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना शासनाने मंजूर केली आहे. या योजनेच्या पाणी टंकींचे बांधकाम पूर्णत्वाकडे असून सध्या पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी शहरातील रस्ते खोदून त्यात पाईप टाकले जात आहेत. पाईप टाकण्याच्या या कामात अवघ्या शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. मध्यंतरी या रस्त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या कंत्राटदारांकडूनच दुरूस्ती करण्यात आली. मात्र निकृष्ट कामामुळे रस्त्यांची दुर्गत झाली आहे. आता तरी पाईप लाईनचे काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा योजना सुरू होणार असा विचार करून शहरवासीयांनी या कामाला समर्थन दिले. मात्र वर्ष लोटूनही अद्याप रस्ते खोदण्याचेच काम केले जात असल्याने योजनेचा शुभारंभ कधी असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. रस्ता खोदकामामुळे एक तर शहरवासीयांना वाहतूकीला त्रास होत आहे. शिवाय खोदकामात निघत असलेल्या मातीच्या धुळीमुळे याचा आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. आजघडीला तोंडावर रूमाल बांधून वावरण्याशिवाय दुसरा मार्ग शहरवासीयांपुढे नाही. त्यातही आणखी किती दिवस हे रस्ते खोदकाम केले जाणार हे सुद्धा स्पष्ट नाही. मागील दोन-तीन दिवसांपासून बाजारात पाईप लाईन टाकणे सुरू आहे. यामुळे पूर्ण बाजारातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लग्न सराईचा हंगाम सुरू असून बाजारात गर्दी दिसून येत आहे. त्यात या खोदकामामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. सततच्या त्रासामुळे मात्र आता शहरवासी त्रस्त झाले असून त्यांत रोष दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)