एसएमएसद्वारे नागरिकांना मिळणार प्रकरणांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:58 IST2019-07-20T23:57:25+5:302019-07-20T23:58:49+5:30
साहेब काम झाले का, आमचे प्रकरण मार्गी लागले का, यासाठी नागरिकांना बरेचदा वांरवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील प्रकरणाची माहिती आता संबंधिताना एसएमएसव्दारे मोबाईलवर दिली जाणार आहे.

एसएमएसद्वारे नागरिकांना मिळणार प्रकरणांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : साहेब काम झाले का, आमचे प्रकरण मार्गी लागले का, यासाठी नागरिकांना बरेचदा वांरवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील प्रकरणाची माहिती आता संबंधिताना एसएमएसव्दारे मोबाईलवर दिली जाणार आहे. त्यामुळे श्रम, वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या विविध अपील प्रकरणात वारंवार येणाºया नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात पारदर्शीता आणण्यासाठी व नागरिकांच्या पैसा आणि वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अपील प्रकरणात संबंधितांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुनावणीची दिनांक व वेळ याबाबतची पूर्व सूचना देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु केली. अनेकदा प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्ततेमुळे किंवा महत्त्वाच्या कामांमुळे अपील प्रकरणाची सुनावणी होत नाही. त्यामुळे सुनावणीसाठी दूरवरुन येणाºया नागरिकांचा वेळ, प्रवास व पैशाचा अपव्यय होतो.
तसेच काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यास त्याची सूचना आणि दिनांक व वेळेची माहिती मोबाईलवर एसएमएसद्वारे संबंधितांना देण्यात येईल. त्यामुळे नागरिक ठरविलेल्या तारखेस वेळेत उपस्थित राहतील.
अपिल प्रकरणात असलेल्या सर्व संबंधितांना या सुविधेमुळे लाभ होणार आहे. नागरिकांची होणारी पायपीट कमी होवून त्यांच्या वेळ आणि पैशाची बचत व्हावी या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
- डॉ.कादंबरी बलकवडे,
जिल्हाधिकारी गोंदिया.