आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचाराकडे नागरिकांचा कल
By Admin | Updated: May 18, 2015 00:54 IST2015-05-18T00:54:33+5:302015-05-18T00:54:33+5:30
वेद काळातील आयुर्वेद उपचाराकडे जिल्ह्यातील रूग्णांचा कल वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे.

आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचाराकडे नागरिकांचा कल
गोंदिया : वेद काळातील आयुर्वेद उपचाराकडे जिल्ह्यातील रूग्णांचा कल वाढू लागल्याचे चित्र दिसत आहे. ब्रिटिश काळापूर्वी भारतात आयुर्वेद उपचार उच्च शिखरावर होता. मध्यंतरी लवकर गूण मिळत असल्याने अॅलोपॅथिक उपचारांवर रूग्णांचा भर वाढत गेला. परंतु त्याचे अनेक दुष्परिणाम समोर येत असल्याने जिल्ह्यात आयुर्वेदिक तसेच होमिओपॅथी उपचार पद्धतीकडे रूग्णांचा कल पहावयास मिळत आहे.
आयुर्वेद औषधी व उपचाराची वाढती मागणी लक्षात घेता शहरात आयुर्वेद औषधी उपलब्ध करून देणारी अनेक औषधी दुकाने आलीत. ग्रामीण रूग्णालयातील आयुर्वेद चिकित्सा कक्ष हे रूग्णांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पक्षाघात, हाडांचे दुखणे, भगंदर, बवासीर या सारख्या अनेक गंभीर आजारांवर यशस्वी उपचार आयुर्वेद पद्धतीने करण्यात येत आहेत.
त्यासाठी पंचकर्म, स्नेहल स्वेदन, बस्ती, नस्य, तर्पण इत्यादी उपचार प्रक्रिया केल्या जातात. आयुर्वेद उपचाराबरोबरच हळू पण खोलवर आजार बरा करीत असलेल्या होमियोपॅथी औषधोपचार पद्धतीकडेही रूग्णांचा कल वाढत आहे. आयुर्वेद उपचार घेण्यासाठी दिवसेंदिवस कित्येक नागरिकांचा कल दवाखान्यांकडे दिसून येत आहेत.
आजच्या आधुनिक काळात विविध मशीन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रूग्णांचा उपचार केला जातो. परंतु त्याचे दुष्परिणामही भयंकर होत असल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा अवलंब वाढत आहे. आधुनिक काळात आयुर्वेदातही भरपूर संशोधन झाले असून ही पद्धती अधिकाधिक विकसित होत आहे. तर साबूदाण्याच्या गोळ््या ओळखली जाणारी होमियोपॅथीही आज फेमस झाली आहे. (प्रतिनिधी)