उष्माघाताबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी
By Admin | Updated: May 1, 2016 01:48 IST2016-05-01T01:48:20+5:302016-05-01T01:48:20+5:30
प्रत्येक वर्षी एप्रिल मे जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव जाणवतो. उष्माघाताने मृत्यूही होत असतो.

उष्माघाताबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी
तापमानात वाढ : शासकीय डॉक्टरांचे आवाहन
केशोरी : प्रत्येक वर्षी एप्रिल मे जून या महिन्यामध्ये उष्माघाताचा प्रादुर्भाव जाणवतो. उष्माघाताने मृत्यूही होत असतो. उष्माघाताने मृत्यू होऊ नये यासाठी नागरिकांनी आतापासून जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तापमानात प्रथम हळूहळू अथवा एकदम यापैकी कोणत्याही प्रकारे वाढ होत असते. उष्माघात होण्याची प्रमुख कारणांमध्ये उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळ करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, वाढत्या तापमानाशी सतत संबध येण्याचे कारणाने उष्माघात होतो. उष्माघाताची लक्षणे लकवा मारणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साही होणे, डोळे दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन, अस्वस्थता, बेशुध्दावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणे असू शकतात. वाढत्या तापमानात फार वेळ कष्ठाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर व संध्याकाळी कमी तापमान असतांना करावीत, उष्णता शोषून घेणारे कपडे काळ्या किंवा भडक रंगाची कपडे वापरू नयेत, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावीत, जलसंजीवनाचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत द्यावे, अधूनमधून उन्हामध्ये काम करणे टाळावे, सावलीत विश्रांती घ्यावी.
उष्माघाताची लक्षणे सुरू होताच ताबडतोब उन्हात काम करणे थांबवावे व उपचार सुरू करावे, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा याचा वापर करावा. उष्माघाताची लक्षणे दिसताच रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, रुग्णाच्या खोलीत पंखे, कुलर सुरू ठेवावेत किंवा वातानुकूलीत खोलीत ठेवावेत, रुग्णांचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास बर्फाच्या पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्यात आदी उपचाराचे प्रयत्न करावा. (वार्ताहर)