नागरिकांना मास्क लावण्याचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:02+5:302021-03-29T04:17:02+5:30
केशोरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन प्रभावी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अजूही ग्रामीण भागातील ...

नागरिकांना मास्क लावण्याचा पडला विसर
केशोरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन प्रभावी उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अजूही ग्रामीण भागातील नागरिक मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे कोरोनाचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून बेजबाबदार नागरिकांपुढे प्रशासनाने गुडघे टेकले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी गावात येणाऱ्या नवीन व्यक्तींना गावाच्या वेशीवरच रोखून विलगीकरण केंद्रात पाढविले जात होते. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढीवर आळा बसला होता. त्यानंतर लॉकडाऊन शिथिल करून सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले. त्यामध्ये मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम निश्चित केले गेले. कोरोनामुक्त जिल्हा व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनासोबतच तालुका प्रशासन अहोरात्र झटत आहे; परंतु कोणत्याही नागरिकाकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात १०० कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून त्यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २९ रुग्णांचा समावेश आहे.
नवीन वर्षात कोरोनापासून मुक्ती मिळेल अशी अपेक्षा असताना मार्च महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने मास्कचा वापर नियमित करणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक केले आहे. मात्र, असे असतानाही नागरिकांनी मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष करून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला आहे. आता कोरोनाचा वाढता उद्रेक बघता नागरिकांनीच आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरोनापासून मुक्ती मिळणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.