एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांची पंचाईत
By Admin | Updated: October 25, 2014 22:43 IST2014-10-25T22:43:28+5:302014-10-25T22:43:28+5:30
दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम

एटीएम सेवा बंद पडल्याने नागरिकांची पंचाईत
गोंदिया : दिवाळीची लगबग अद्यापही सरलेली नाही. सर्वत्र खरेदीची धावपळ दिसून येत आहे. यासाठी बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बहुतेक जण धाव घेत आहेत. परंतु शहरातील बहुतांश एटीएम नेमक्या याच वेळेवर बंद असल्याचे दिसत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांना नाईलाजाने शाखेत जाऊन रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहेत.
आजघडीला नागरिक आपले सर्व आर्थिक व्यवहार बँकेमार्फत करीत आहेत. यामुळेच जवळ जास्त रोख रक्कम बागळण्याचे टाळत आहेत. अशात एटीएम सेवा अत्यंत महत्वाची व महत्त्वपूर्ण ठरत असून गरज असेल तेव्हा एटीएममधून पैसे काढले जातात. गावागावांत एटीएमची सेवा बँकांमार्फत उपलब्ध केल्याने व्यवहारातही सहजता आली आहे. पण, वर्षभर साथ देत असलेले एटीएम नेमके दिवाळसणाच्या मुहूर्तावर बेईमान होत असल्याचे पहावयास मिळत आहे. दिवाळी निमित्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एटीएममधून पैसे काढल्याने बहुतांश एटीएम बंद पडले आहेत. मोठ्या आशेने लोकं पैसे काढण्यासाठी एटीएमकडे जात आहेत. मात्र त्यांना आल्यापावली परतावे लागत आहे.
सध्या बघावे त्या एटीएमच्या दारावर एटीएम बंद असल्याचे फलक टांगलेले दिसून येत आहे. तर काहींकडून लिंक फेल असल्याचे कारण सांगीतले जात आहे. दिवाळीमुळे सर्वांचीच खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. रोख रक्कम जवळ न बाळगता शहरात खरेदीला जाताना तेथीलच एटीएममधून पैसे काढून खरेदी करण्याचा विचार सर्व जण करीत असतात. पण, शहरात आल्यावर त्यांना बंद एटीएमचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार २० आॅक्टोबरपासून बघावयास मिळत आहे. याबाबत एटीएमवर असलेल्या गार्डला विचारणा केली असता पैसे नसल्याचे कारण तो पुढे करून हात मोकळे करून घेतो. मात्र यामुळे शहरातील बहुतांश एटीएम बंद पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
अन्य कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पाच वेळा पैसे काढण्याची सुट देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास काही रक्कम वजा केली जाते. यामुळे शक्य होईल तेव्हा ग्राहक आपले खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधूनच पैसे काढण्यावर जोर देतात.
दिवाळीत मात्र अनेकांना कित्येकदा पैसे काढावे लागत असून त्याची पर्वा न करता ते पैसे काढून घेतात. सध्या मात्र एटीएम बंद पडून असल्याने नागरिकांनी पैशां अभावी चांगलीच पंचाईत होत आहे. त्यातही येत्या २७ आॅक्टोबर पर्यंत बँकांना सुट्टी असल्याने एटीएम मध्ये पैसे भरणेही अशक्यच वाटत आहे. परिणामी आणखी दोन-तीन दिवस नागरिकांना एटीएम सेवा बंद असल्याचा फटका सहन करावा लागणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. (शहर प्रतिनिधी)