चुलोद रस्ता ठिकठिकाणी उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:30 IST2021-01-23T04:30:03+5:302021-01-23T04:30:03+5:30
गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वे चौकीवर रेल्वे गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांनी चौकावर ताटकळत उभे राहावे लागते. ...

चुलोद रस्ता ठिकठिकाणी उखडला
गोंदिया : शहरातील हड्डीटोली येथील रेल्वे चौकीवर रेल्वे गाड्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असल्याने नागरिकांनी चौकावर ताटकळत उभे राहावे लागते. येथे उड्डाणपूल तयार झाल्यास नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही. करिता हड्डीटोली रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी केली जात होती. आता पूल मंजूर झाला असून, बांधकाम कधी सुरू होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॉलनीत नाली बांधकामाची मागणी
गोंदिया : शहरातील विवेकानंद कॉलनीत नाल्यांचे बांधकाम नसल्याने, कित्येकांच्या घरासमोर पावसाचे पाणी साचून राहते. अशात कित्येकदा पावसाचे पाणी त्यामुळे चिखलात घसरून नागरिक घसरून पडले आहेत. नगरपरिषदेने घरासमोर नाली बांधकाम केल्यास पावसाचे पाणी त्यातून निघून जाणार. त्याकरिता नाली बांधकामाची मागणी केली जात आहे.
उखडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
गोंदिया : मामा चौक ते डॉ.गुजर यांच्या घरापर्यंतचा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर रद्द करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. मात्र, रस्ता उखडला असल्याने नागरिकांची चांगलीच फजिती होत आहे. रस्ता बांधकामाची मागणी केली जात आहे.
सिव्हिल लाइन्स परिसर अंधारात
गोंदिया : शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील माता मंदिर चौक ते पुढे मामा चौकपर्यंत पथदिवे रात्री बंद असतात. यामुळे हा परिसर रात्री अंधारात असतो. या परिसरातील रस्ते अगोदरच उखडलेले आहेत. त्यात अंधार असल्याने नागरिकांनी ये-जा करताना त्रास होतो. नगरपरिषदेने लक्ष देऊन पथदिवे सुरू करण्याची गरज आहे.
ब्रेकर ठरत आहेत धोकादायक
गोंदिया : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. या ब्रेकरमुळे नागरिकांना वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत. कित्येकदा दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती खाली पडल्याचे प्रकार घडले आहेत. अव्यवस्थितरीत्या तयार करण्यात आलेले ब्रेकर काढण्याची मागणी केली जात आहे.
शहरात डुकरांचा हैदोस वाढला
गोंदिया : शहरात डुकरांची पैदास वाढत असल्याने मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. डुक्कर मोकाटपणे रस्त्यांवर फिरताना दिसतात. या डुकरांमुळे कित्येकदा दुचाकींचे अपघात घडले आहेत. नगरपरिषदेने डुकर पकडण्यासाठी निविदाही काढली. मात्र, कुणीही त्यात इच्छा दाखविली नाही. परिणामी, डुकरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, मोकाट डुकरांचा हैदोसही वाढत आहे. नगरपरिषदेने कठोर पाऊल उचलण्याची मागणी शहरवासी करीत आहेत.
डासनाशक फवारणीची मागणी
गोंदिया : शहरात डासांचा जोर चांगलाच वाढला आहे. रात्रीला डासांमुळे नागरिकांना झोपणे कठीण होत आहे, शिवाय डासजन्य आजारांमुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. नगरपरिषदेने डासनाशक फवारणी करण्याची मागणी केली जात आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
सालेकसा : तालुक्यातील काही गावांत व्यायाम शाळा नसल्याने युवकांना अडचण जात आहे. त्यामुळे व्यायमशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील अनेक गावांत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून व्यायामशाळा निर्माण झाल्या आहेत. मात्र, अजूनही काही गावांत व्यायामशाळा नाही. या वर्षी कोरोनामुळे व्यायाम केंद्रावर निर्बंध आले आहे. मात्र, भविष्यात गावातील युवकांना व्यायाम करण्यासाठी सोपे होईल.
ग्रामीण भागात माकडांचा आतंक
वडेगाव : सध्या सगळीकडे शेतीची कामे सुरू आहेत. शेतात नागरिकांची उपस्थिती असल्यामुळे माकडांनी गावाकडे धाव घेतली आहे. माकडे घरावरील केवलू व भाजीपाल्याचे नुकसान करीत आहेत.
दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर
गोंदिया : येथील रेल्वे स्थानक लगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंधही पसरतो. परिणामी, येथून ये-जा करणाऱ्यांना नाक दाबून राहावे लागते. नगरपरिषदेकडे सफाई केली जाते. मात्र, परिसरातील नागरिक तेथेच कचरा टाकत असल्याने, तीच स्थिती निर्माण होते.
सडक योजनेच्या रस्त्यांची दुरवस्था
तिरोडा : तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची निर्मिती व डांबरीकरणाचे काम करण्यात आले, परंतु यापैकी अनेक रस्त्यांची अल्पावधीतच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्ता बांधकामांना घेऊन प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
तंटामुक्त गाव अभियान नावापुरतेच
सडक-अर्जुनी : राज्य शासनाच्या तंटामुक्ती गाव अभियान योजनेला गावा-गावातील राजकीय गटबाजी आणि अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांमुळे ग्रहण लागल्याने या अभिनव योजनेचा अनेक गावात फज्जा उडाला आहे.