जीर्ण आवारभिंत धोकादायक
By Admin | Updated: July 23, 2016 02:16 IST2016-07-23T02:16:19+5:302016-07-23T02:16:19+5:30
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरक्षाभिंत (आवार) अगदी जीर्ण झाली असून काही ठिकाणातून ती पडली आहे.

जीर्ण आवारभिंत धोकादायक
प्रशासनाचे दुर्लक्ष : केसलवाडा प्राथमिक शाळेतील प्रकार
केसलवाडा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरक्षाभिंत (आवार) अगदी जीर्ण झाली असून काही ठिकाणातून ती पडली आहे. या आवारभिंतीजवळ विद्यार्थी खेळतात व लघुशंका करतात. त्यामुळे एखाद्यावेळी ही सुरक्षाभिंत पडून मोठा धोका होण्याची शक्यता आहे. ही समस्या उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
देशाचे भावी नागरिक घडविणाऱ्या शाळा अद्ययावत असणे गरजेचे आहे. शिक्षण, क्रीडा व इतर बाबींच्या सुविधांसह सुसज्ज इमारत असणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये आवारभिंत नाहीत, असल्याच तर पडक्या आहेत. काही ठिकाणी छत तुटलेले आहेत तर काही ठिकाणी ते योग्यरित्या शाकारलेले नाहीत. त्यामुळे वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी गळते. अशा अनेक समस्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिसून येतात. अशीच एक समस्या केसलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेची असून जीर्ण आवारभिंतीमुळे विद्यार्थ्यांचे जीव कधीही संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केसलवाडा येथील जि.प. शाळेची आवारभिंत पडलेल्या ठिकाणी काटेरी कुंपन करण्यात आले आहे. या प्राथमिक शाळेत १६२ विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. याच शाळेच्या आवारामध्ये अंगणवाडी-१ मध्ये ३० व अंगणवाडी-२ मध्ये ४० असे एकूण ६० लहान मुले शिक्षण घेत आहेत. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या जीर्ण झालेल्या, अर्धवट तुटलेल्या व अर्धवट लटकलेल्या सुरक्षा भिंतीजवळ विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी खेळाचे साहित्य लावलेले आहेत. शाळेत हजर असलेले विद्यार्थी लघुशंका व मध्यंतरी भोजनाच्या सुटीच्या वेळी येथे खेळायला येतात. काही विद्यार्थी या सुरक्षाभिंतीजवळ उभे राहतात.
अशा या जीर्ण झालेल्या व अर्धवट तुटलेल्या सुरक्षाभिंतीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुर्दैवाने जर काही धोका झाला तर या घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न पालकांना पडला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. आपल्या मुलांचा जीव धोक्यात येण्याची भीती पालकांना वाटत आहे. आपल्या मुलांचे सुंदर व उज्वल भविष्य घडवू पाहणाऱ्या या पालकांना संबंधित अधिकाऱ्यांकडून शक्य तितक्या लवकर मदतीची अपेक्षा आहे.
तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या गंभीर व महत्वाच्या विषयाकडे त्वरित लक्ष देवून नवीन व मजबूत सुरक्षाभिंत शक्य तितक्या लवकर बांधून द्यावे, अशी मागणी सर्व पालकांनी व गावातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)