नगर पंचायतीत सभापतींची निवड
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:47+5:302015-12-05T09:07:47+5:30
जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या चार नगर पंचायतींमध्ये विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली.

नगर पंचायतीत सभापतींची निवड
आठ स्वीकृत सदस्य : सर्वच पक्षांना मिळाली संधी
गोंदिया : जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या चार नगर पंचायतींमध्ये विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. यासोबतच प्रत्येकी २ अशा ८ स्वीकृत सदस्यांचीही निवड करण्यात आली. यात सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनाही सदस्यत्वाची संधी मिळाली.
अर्जुनी मोरगाव : विषय समितीच्या सभापतींची निवड शुक्रवारला स्थानिक नगरपंचायत कार्यालयात झाली. यात अपक्ष वगळता सत्ता स्थापनेस मदत करणाऱ्या सर्वच पक्षांना प्रतिनिधीत्व मिळाले. सर्वपक्षीय सत्ता असलेली आणि विरोधी पक्षच नसलेली जिल्ह्यातील ही एकमेव नगर पंचायत ठरली आहे.
शुक्रवारी झालेल्या (दि.४) विषय समिती निवड प्रक्रियेपूर्वी नगराध्यक्ष काँग्रेसचा व उपाध्यक्ष भाजपचा अशी निवड झाली होती. नगर उपाध्यक्ष निवडीच्या वेळी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य एकत्र आले. त्यावेळी भाजपला सहकार्य करण्याचे पारितोषिक आज राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळाले. मात्र तरीसुद्धा राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला पद न मिळाल्याने हिरमोड झाला. भाजप-युतीपक्षांना तीन व काँग्रेसला दोन मतांचा अधिकार मिळाला.
राष्ट्रवादीचे प्रकाश शहारे यांची बांधकाम तर शिवसेनेच्या ममता पवार यांची महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी वर्णी लागली. उपाध्यक्ष विजय कापगते (भाजप) यांची स्वच्छता व आरोग्य समितीवर आणि बालकल्याण समितीचे सभापती पदासाठी ममता पवार व काँग्रेसच्या प्रज्ञा गणवीर यांचे नामांकन दाखल झाले. सारखी मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठीने ममता पवार यांची निवड झाली. बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या हेमलता घाटबांधे व काँग्रेसच्या उर्मिला जुगनाके यांचे नामांकन दाखल झाले. यात उर्मिला जुगनाके यांची निवड झाली.
काँग्रेसचे गटनेता किशोर शहारे यांनी सर्वेश भुतडा तर भाजपचे गटनेता देवेंद्र टेंभरे यांनी हेमंत भांडारकर यांचे स्विकृत सदस्यांसाठी नाव सूचविले आणि त्या दोघांचीही स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. नगर पंचायत निवडणुकीपर्यंत हेमंत भांडारकर हे राष्ट्रवादी कार्यकर्ता होते. त्यांनी प्रभाग क्र. १० मधून उमेदवारी मागितली होती. पक्षाने ती दिली नाही. पक्षविरोधी कारवाई म्हणून त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले. तर दुसरीकडे भाजपकडून त्यांची स्विकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. हा नगरात चर्चेचा विषय होता.
गोरेगाव : येथील नगर पंचायत सभापतींच्या निवडणुकीत बांधकाम सभापती राजू टेंभुर्णीकर (अपक्ष), आरोग्य सभापती आशिष बारेवार (अपक्ष), बालकल्याण सभापती निमावती धपाडे (काँग्रेस) आणि पाणी पुरवठा सभापती मधुमाला साखरे (काँग्रेस) तर स्वीकृत सदस्य सुरेंद्र पटले (भाजपा), मलेशाम येरोला (काँग्रेस) यांची निवड झाली. पिठासिन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, प्रशासक व तहसीलदार भास्कर बांबुर्डे, नायब तहसीलदार नागपुरे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी नगर पंचायतमध्ये सभापतीपदाच्या निवडणुकीत बांधकाम सभापती म्हणून अभय राऊत (काँग्रेस), पाणी पुरवठा व स्वच्छता सभापती महेश सूर्यवंशी (अपक्ष), महिला व बालकल्याण सभापती शशीकला टेंभुर्णे (राकाँ), स्वीकृत सदस्य दिलीप गभणे (भाजपा), मोहनकुमार शर्मा (राष्ट्रवादी) यांची निवड झाली.
देवरी : नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. येथे बांधकाम सभापती म्हणून राष्ट्रवादीचे आफताब उर्फ अन्नू अलताफ शेख, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी माया लेखराम निर्वाण, शिक्षण-अर्थ व नियोजन सभापतीपदी नेमीचंद श्रीराम आंबीलकर तसेच स्वच्छता, पाणी पुरवठा सभापतीपदी न.पं.चे उपाध्यक्ष काँग्रेसचे ओमप्रकाश रामटेके यांची निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्य म्हणून राष्ट्रवादीचे महेशकुमार जैन व भाजपाचे अनिल अग्रवाल यांची निवड झाली. ही निवड प्रक्रिया उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी आणि तहसीलदार नागटीळक यांच्या मार्गदर्शनात पार पडली.